सोलापूरची सुगरण

ज्ञानदा चव्हाण

आपल्या आजूबाजूला खूप हॉटेल्स असतात, पण जिथे जाऊन खरचं जिभेचे चोचले भागवता येतात आणि चविष्ट जेवण जेवल्याचं समाधान मिळतं अशी खूप कमी हॉटेल्स आहेत.. मी फारशी फिरत नाही, पण मी जेवलेल्या हॉटेल्सपैकी माझ्या मनात घरं केलेलं होटेल म्हणजे सोलापूर मधलं सुगरण.. गेल्या वर्षी कामानिमित्त सोलापूरला गेले असताना या हॉटेलची आणि माझी पहिली ओळख झाली आणि तेव्हापासून मी इथल्या स्वादिष्ट जेवणाच्या प्रेमात पडलेय…Image

आमचे एक स्नेही आमच्या पूर्ण टीमला आग्रहानं या सुगरण मध्ये घेऊन गेले, आम्ही सगळे प्रवासानं अतिशय थकलेले असल्यामुळे कुणी फार काही प्रश्न विचारले नाहीत, सुगरण मध्ये पोहचल्यावर कळलं की ही खानावळ कम हॉटेल आहे, लाकडी बाकं-टेबलं, त्यावर ठेवलेले स्टीलचे जग आणि पाण्याचे ग्लास आणि सततची वर्दळ.. भूक खूप लागली होती, आम्ही काही ऑर्डर करण्याआधी आमच्या स्नेहींनी आमच्यासाठी खवा पोळीची ऑर्डर देऊन टाकली, हा काय प्रकार असेल याच्या विचारात असताना गरमा-गरम, खरपूस भाजलेली, तूपाची धार सोडलेली यम्मी खवा पोळी समोर आली, पहिला घास तोंडात आणि साऱ्यांचे चेहरे आनंदले, खरतरं जेवणाच्या सुरवातीलाच आम्ही डेझर्ट खात होतो पण या एका घासावरून या हॉटेलचं नाव सुगरण किती सार्थ आहे याची जाणीव झाली.. इतकी सुंदर खवापोळी मी आयुष्यात कुठेही खाल्लेली नाही…

सुगरणचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे, सुगरण मध्ये किचन पासून गल्ल्यापर्यंत सगळी कामं बायकाच पाहतात,अगदी जेवण वाढणाऱ्या मावशी सुद्धा घरातल्या पंक्तीत असलेल्या माणसाला करतात तसा प्रेमळ आग्रह.. सुगरण मध्ये थाळी सिस्टिम आहे, पोळ्या, दोन भाज्या, वरण, डाळ, भात, एखादं स्वीट, दही आणि या भल्या मोठ्या थाळीसोबत, चटणी, काकडची खमंग कोशींबीर,लोणचं, सोलापूरची खासियत असलेली शेंगा चटणी असं साग्रसंगीत सजवलेलं ताट तुमच्या समोर येतं, अशी मेजवानी समोर असताना तोंडाला पाणी सुटलं नाही तरचं नवल…

तुम्ही मोठ्या थाळीची ऑर्डर दिलीत की अनलिमिटेड जेवण, पण ताटात टाकायचं मात्र काही नाही… पण जेवणचं इतकं सुग्रास असतं की पानात काही शिल्लक ठेवण्याचा सवालच नाही..

सुगरण मध्ये काहीही खा, जेवण एकदम फर्स्ट क्लास, खवापोळी तर अप्रतिमच पण त्याचसोबत सोलापूरची खास शेंगापोळी, ऑल टाईम फेव्हरीट पुरणपोळीची चव चाखायला हरकत नाही.. सोलापूरकरांपेक्षा सुगरण मध्ये इतरांचीच गर्दी जास्त, स्टेशनच्या अगदी जवळच असल्यानं आधी सुगरण मध्ये भरपेट जेवा आणि मग ट्रेन पकडा हे तर जणू समीकरणच झालय… सोलापूरला जायचं असेल तर मला सुगरण आणि खवापोळीची कधी भेट होईल असं होत..

पण वर्षभरापूर्वीच्या सुगरणचं रूपडं आता पालटलंय, आता सुगरण बनलयं एक प्रोफेशनल हॉटेल, जिथे एसी, नॉन-एसी हॉल मध्ये बसून जेवण्याची सोय आहे, अंतर्गत सजावटपण अगदी चकचकीत, पण जुन्या रूपड्यात एक वेगळीच मजा होती… हा पण रूप बदलेलं असलं तरी चवीत मात्र नो कॉम्प्रोमाईज, जी चव वर्षभरापूर्वी तीच चव यावेळी पण चाखता आली.. खरंतर सोलापूरातल्या दूषित पाण्याच्या बातम्या एकून मी संपूर्ण सोलापूरात कुठेही पाणी पिण्याची हिंमत केली नाही पण का कोण जाणे सुगरणमध्ये टेबलावर असलेल्या जगातलं ( NO MINARAL WATER) पाणी पिताना माझ्यामनात कधीच शंका आली नाही, मी ते पाणी बिनधास्त प्यायले, कदाचित सुगरणचं घरपण आणि आपुलकी यातच दडलेली असावी.. कधी सोलापूरला गेलात तर सुगरण मध्ये अवश्य जेवा…

(ज्ञानदा चव्हाण, एबीपी माझाच्या एँकर आहेत)

Leave a Reply