Site icon

वडापावचा गाव

Advertisements

जान्हवी मुळे

कर्जतचं नाव काढलं की बहुतेकांना तीन गोष्टी लगेचच आठवतात- फास्ट लोकल, पावसाळी सहल आणि वडापाव. कर्जतचा वडापाव आहेच तसा खास.

मुंबई आणि पुण्याच्या कुशीत वसलेल्या या गावाची ओळखच बनला आहे वडापाव. या दोन शहरांना जोडणारी रेल्वे झाल्यावरच कर्जत वाढलं, फोफावत गेलं. पुण्याच्या वाटेवर घाटमाथा चढण्याआधी गाड्या कर्जतला थांबू लागल्या. नवं इंजिन जोडलं जाईपर्यंत स्टेशनवर वडेवाल्यांचा जमके धंदा होऊ लागला.

स्टेशनवरचा हा वडा, म्हणजे दिवाडकरांचा वडा. आकारानं काहीसा लहान आणि म्हणूनच घाटातून गाडी जाताना सहज खाता येईल असा. लहानपणी कधी रेल्वेनं प्रवास करायची वेळ आली, तर आम्ही स्टेशनवरचा वडा खायचो आणि कधीकधी केवळ दिवाडकर वडा घेण्यासाठी स्टेशनवर जायचो.

कर्जतपाठोपाठ नेरळ, माथेरान आणि मुंबई-पुणे हायवेवरही दिवाडकर वडा मिळू लागला. आता दिवाडकरांनी फ्रँचायझी इतरांना दिली आहे. पण गेली कित्येक दशकं, कित्येक पिढ्या दिवाडकर स्पेशल वडा आपलं नाव राखून आहे. अगदी पु.लं., आचार्य अत्रेंनीही इथल्या बटाट्यावड्याचा उल्लेख केला आहे ओझरता.

कर्जतच्या वाटेनं प्रवास करणाऱ्यांना दिवाडकर वडा ओळखीचा आहे. पण गावात आणखीही काही ठिकाणी उत्तम वडा मिळतो. त्यातले दोन वडेवाले माझ्या खास आवडीचे आहेत.

एक आहे स्टेशनबाहेरचा आनंद भुवनचा वडा आणि दुसरा सट्टूचा वडा. आनंद भुवन म्हणजे दगडे कुटूंबियांचं उपहारगृह. चारुदत्त दगडे १९८८ पासून या व्यवसायात आहेत. मला आठवतं तेव्हापासून आम्ही बहुतेकदा त्यांच्याकडूनच वडा विकत घ्यायचो. आजही घेतो.

तसं आमच्या घरी बाहेरचं अरबट-चरबट खायला साफ मनाई असायची. अपवाद केवळ दगडेकाकांकडच्या वड्याचा. आता त्यांच्या नव्या पिढीनं वेगळी वाट निवडली आहे, पण दगडे काका आजही स्वतः धंद्यात जातीनं लक्ष घालतात. त्यांच्याकडच्या वड्याचा दर्जा आजही तसाच आहे.

पुढे आणखी एका वड्याची चव आमच्या जिभेवर रेंगाळू लागली. आमच्या घरापासून जवळच असणारा सट्टूचा वडा. सट्टू म्हणजे संतोषदादा. आधी हातगाडी, मग छोटा स्टॉल आणि मग स्वतःचा गाळा असा सट्टूच्या वड्याचा प्रवास, वड्यातल्या कमाईनंच झालेला. मराठी शाळेला लागून एका इमारतीच्या आतल्या बाजूस हे दुकान आहे.

काळ बदलला, तसा एक बदल मात्र घडला आहे. किंमत. पूर्वी एक रुपयाला मिळणारा वडापाव आता दहा रुपयांना मिळू लागला आहे. महागाईमुळे तीन महिन्यांपूर्वीच अचानक तीन रुपयांनी किंमत वाढवण्यात आली. पण चव मात्र अजूनही तशीच आहे.

कर्जतचा वडापाव म्हटलं तर इतर वड्यांसारखाच असतो. पण याची खासियत आहे ती यासाठी वापरला जाणारा बटाटा आणि वड्याबरोबर मिळणारी लसणाची खमंग चटणी. म्हणूनच एकदा हा वडा खाल्लात, की कधीच विसरणार नाही असा. कर्जतकरांच्या घरी बाहेरगावहून कोणी पाहुणे आले, की आजही वडापावची न्याहरी एकदातरी होतेच.

कामानिमित्त आता मी मुंबईत स्थिरावले. इथे तर वडापाव म्हणजे आद्य-खाद्यच. त्यामुळे आमच्यासारख्या वडापावप्रेमींची चंगळच. गेल्या काही वर्षांत मुंबईतल्या वडापावसाठी प्रसिद्ध ठिकाणांना भेटी देऊन झाल्या. शिवाजी पार्क, किर्ती कॉलेज, पार्ल्याचं साठ्ये कॉलेज इथल्या वड्यापासून ते जम्बो किंगचा वडा खाऊन झाला. पण कर्जतच्या वड्याची सर कशालाच नाही. कदाचित तिथली मोकळी हवा, पाऊस आणि माझं गावाशी असलेलं नातं, यामुळेच कर्जतचा वडा मला जास्त जवळचा वाटतो.

प्रत्येक वड्याचं आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे, हे मात्र खरं. म्हणूनच मुंबईतून बाहेरगावी गेलेला माणूस वडापावसाठी कासावीस होतो. माझ्या दिल्लीतील मित्र-मैत्रिणींनी तर मला येताना वडापाव आण असा आदेशच दिला होता.

मला जमलं नाही, आणि रश्मी अगदी खट्टू झाली. पण मग राजीव चौक (कनॉट प्लेस) मेट्रो स्टेशनवर अगदी मुंबईसारखाच वडापाव विकणाऱ्या स्टॉलचा शोध लागला तेव्हा रश्मीला कोण आनंद झाला होता! त्या आनंदातच मला माफीही मिळाली. आणि एक वास्तव जाणवलं, समोसा जगभर पोहोचला, तसा वडा देशभर तरी पोहोचायला हवा. वडापावच्या गावातून आलेल्या वडापावप्रेमीनंच हे पाऊल टाकावं असं मनापासून वाटतं…

Exit mobile version