बादशाहीचा बादशाही थाट

स्वप्नाली अभंग, पुणे

खानवळ म्हटलं कि, डोळ्यासमोर येते ते पाणचट आमट्या, पातळ डाळ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र पुण्यातल्या टिळक रोडवरच्या बादशाहीचं मात्र असं नाही. चवीत आणि दर्जा याबाबतीत बादशाही ख्रोखरीच बादशाही आहे. इथ तीन तीन तास वेटिंग करणारे  अनेक जण नुसता बादशाहीचा आमटी भात मिळाला तरी धन्य मानतात कारण त्यांच्या मते बादशाहीच्या नुसत्या आमटी भाताने ही पोट भरतं आणि मनं ही समाधानी होतं.

आमटी, दोन भाज्या, फुलके, भात, लोणचे, कोशिंबीर, कांदा आणि ताक असं बादशाहीच्या थाळीचं स्वरूप आहे. शिवाय पाहिजे असल्यास गोडाचे पदार्थ मिळतात ज्याच्यासाठी ज्यादा दर आकारण्यात येतो. दर दिवशी आणि प्रत्येक वेळेला इथल्या भाज्यांमध्ये प्रचंड व्हरायटी असते. आळू आणि सूरण या भाज्यांपासून ते दोडक्याचा रस्सा आणि घेवड्याची सुकी भाजी इथपर्यंत अनेक भाज्या इथं चाखायला मिळतात. अनेक भाज्यांना नाकं मुरडणारी मंडळी इथल्या भाज्यावर मात्र तुटून पडतात. याचं कारण एकच बादशाहीची अफलातून चव.बादशाही खानावळ

परंपरा १९६७ पासूनची
१९६७ साली सुरु झालेली बादशाही खानावळ आजच्या मेक्सिकन, इटालीयन, अमेरिकन फूड कल्चरच्या जमान्यातही आपलं वेगळे पण टिकवून आहे. बादशाही चे मालक वामन नागेश छत्रे यांनी सात्विक अन्न, स्वच्छता, शिस्तब्द्ता याद्वारे बादशाहीचा आदर्श निर्माण केला. वामन छत्रे यांच्या नंतर त्यांचे पूत्र सदानंद छत्रे यांनी ही बादशाहीच्या या थाटात कसलाही खंड पडू दिलेला नाही. इथल्या पदार्थांची चव तर इतरत्र कूठेही मिळणार नाही.

कोकणी गोडवा
सदानंद छत्रे याच सारं श्रेय देतात ते आपल्या कर्मचाऱ्यांना. इथला कर्मचारी वर्ग आहे तो कोकणातला. अगदी आचाऱ्यांपासून ते वाढप्या परर्यंत सगळेच बादशाहीच्या प्रवासात अगदी सुरवाती पासूनचे.

त्यामूळेच पदार्थ तयार करण्यापासून तो वाढ्ण्यापर्यंत च्या प्रवासातला हा कोकणी गोडवा पदार्थंची लज्जत अधिकच वाढवतो.

बादशाहीची आमटी आणि ताक
आळुची भाजी, भरलेले वागं, भरीत, सुरणाची भाजी, वालची उसळ अशा इथल्या अनेक पदार्थांवर खवय्ये फिदा आहेत. इथली आमटी आणि ताक हे तर बादशाहिचं खरं वैशिष्ट्यं. भाज्यां मध्ये ओला नारळ सढळ हस्ते वापरले जातो. रात्री उशीरा आलेली माणसं केवळ आमटी भात ही चालेल असं म्हणून पार्सल नेतात तर आमटी नसेल तर ताक भाता वरही समाधान मानणारे आहेच.

केवळ चवीतच नाही तर इतर अनेक गोष्टीमूळे बादशाहीने आपलं बादशाहीपण सिध्द केलं आहे. जुन्या लाकडी खुर्च्या, टेबल, पितळी तांबे, ताटातील डाव्या उजव्याचा शिष्टाचार, सात्विक अन्न आणि जोडीला विविध भारती वरील जुनी गाणी यामूळे इथल्या वातावरणाला जो अ‍ॅण्टिक फिल येतो तो शब्दांत मांडण ख्रोखरीच कठीण आहे.

बादशाहीत नित्यनियामाने अनेक वर्षांपासून येणारे अनेक जण आहेत. आर.व्ही बोरकर हे तर १९७४ पासून बादशाहीत येतात. त्यांना इथल्या जेवणाची इतकी सवय झाली आहे की आता घरी गेल्या नंतर त्यांना घरचं ही जेवण आवडत नाही. विश्वासराव आठवले याचं असंच काहीसं ते गेली ९ वर्ष बादशाहीचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्या मते बादशाहीची पिठलं भाकरी आणि टोमॅटोच्या साराला तर तोड नाही.

या बादशाहीची ख्यातीच अशी की, कलाकार मंडळी आणि परदेशी पर्यट्कांना पुण्यात आल्यानंतर बादशाहीत जेवणाचा मोह आवरणं कठीण. अस्सल महाराष्ट्रीयन सात्विक अन्नाचा अस्वाद घेण्याकरता अनेक अमराठी लोक इथं गर्दी करतात.

बादशाहीचा सारा कारभार हा कडक शिस्तीतच चालतो. कूपन घेण्यापुर्वी आवडीच्या भाज्या आहेत की नाही याची चौकशी करावी, पानात अन्न टाकू नये, जेवताना मोबाईल वर बोलणं टाळावं अशा आशयच्या अनेक पाट्या दिसतील. तेव्हा बादशाहीचा हा बादशाही थाट अनुभवण्यासाठी बादशाहीत येणं तर मस्ट आहे.

बादशाही थाळी  ७० रुपये (2013)
गोड पदार्थांसाठी ज्यादा २५ रुपये
पार्सल थाळी ९० रुपये
वेळ दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८.३० ते १०
सोमवारी बादशाही बंद असते.

One thought on “बादशाहीचा बादशाही थाट

  1. खरंच मस्त जेवण असते आणि ८० च्या दशकातील खानावळीचा लुक 🙂 …….बादशाहीत जेवण म्हणजे पोट तृप्त…

Leave a Reply