‘साई कार फॅमिली ढाबा’ |खापरावरची पुरणपोळी| सातपुडाच्या पाटोड्या |

धुळ्याहून नाशिकला जातांना हा साई कार फॅमिली ढाबा लागतो, धुळे ते मालेगाव दरम्यान हा ढाबा आहे. नाशिककडे जातांना धुळ्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर हा ढाबा आहे, तर मालेगावपासून १८ किलोमीटरवर साईकार ढाबा लागतो. मालेगावजवळ देवरपाडे-झोडगे गावाजवळ हा ढाबा आहे.sai-car_family_dhaba
या ढाब्यावरचं जेवणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण ठरेल, शुद्ध शाकाहारी आणि फक्त कार तसेच बाईक वाल्यांसाठीचं येथे जेवणं दिलं जातं, या ढाब्याचं वैशिष्ठ म्हणजे संपूर्ण नैसर्गिक वातावरणात, खान्देशचं जेवणं तुम्हाला मिळतं.

खापरावरची पुरणपोळी
इथली खापरावरची पुरणपोळी खाण्याची हौस तुम्हाला भागवता येते, ही खापरावरची पुरणपोळी अप्रतिम असते, पुरणपोळी खाल्ल्यावर या पुरणपोळीची चव सदैव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहणार आहे.sai_car_family_dhaba_malegaon_nashik

सातपुळाच्या पाटोड्या
दुसरा सर्वात महत्वाचा पदार्थ आहे, सातपुळाच्या पाटोड्या, हा खान्देशी पदार्थ खातांना, तुम्ही खान्देशी खाद्य संस्कृतीची वाहवा केल्याशिवाय राहणार नाहीत, येथील पदार्थांमध्ये वापरलं जाणारं साजूक तूप हॉटेल मालकांच्या गाईंच्या दुधापासूनच बनवलेलं असतं. त्यामुळे निर्भेळ साजूक तुपाची गावाकडची चव देखिल तुम्हाला चाखायला मिळतं.

आईस्क्रीमपेक्षाही इथलं दही खाऊन पाहा
या ढाब्यावरचं सर्वात महत्वाचं म्हणजे इथलं दही, तुम्हाला दही खायला आवडतं नसेल तर एक चमचाभर दही तुम्ही इथलं खाऊन पाहा, तुम्ही अख्ख मातीच्या छोट्याशा मडक्यातलं दही संपवल्याशिवाय राहणार नाहीत.

तुम्हाला शेतात आल्यासारखं वाटेल
साईकारढाब्यावर फॅमिलीसाठी वेगळी बसण्याची फार चांगली सुविधा आहे. मुंबई-पुण्यातल्या लोकांना तर ही जागा खूपचं मोकळी वाटते एवढंच नाही तर तुम्हाला शेतात आल्यासारखं वाटेल जेव्हा हॉटेलच्या मागच्या बाजूला तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्याल, तेव्हा या रस्त्याने गेले तर नक्की साई कार ढाब्याला भेट द्या.

या ढाब्यावरील मालकांचं ग्राहकांना त्रास होणार नाही, याकडे खास लक्ष असतं, फोन करून तुम्ही पत्ता विचारला तरी तुम्हाला सहकार्य ते करतील, अगदी तुम्ही ढाब्यावर व्यवस्थित पोहोचेपर्यंत.

पत्ता
साई कार फॅमिली ढाबा
मालेगाव-धुळे दरम्यान,
मालेगावपासून १८, तर धुळ्यापासून ३२ किमी अंतरावर
देवरपाडे गाव, पोस्ट झोडगे
तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक
फोन नंबर 02554/265276
मोबाईल नंबर 9960286751 / 9766772324

अमळनेरच्या अंबर हॉटेलची प्रसिद्ध मिसळ

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये कचेरीकडून बसस्टॅण्डकडे जातांना अंबर नावाचं हॉटेल आहे.

या हॉटेलवरची मिसळ ही अप्रतिम आहे, ही मिसळ एवढी रूचकर असते की, मुंबई पुण्यासारखा या मिसळ बरोबर पाव घेण्याची गरजच नसते, अस्सल देशी फरसाण असल्याने आणि त्यावर मटकीचा रस्सा यामुळे ही चव अप्रतिम होते.

ambar_misal_amalnerया हॉटेलवर वडा रस्साही तसाच मिळतो, वडा रस्साठी तुम्हाला पावाची गरजच नाही, तुम्ही मागितला तरी तो तुम्हाला ते देणार नाहीत, कारण तशी पद्धतच नाहीय. एवढी या वडा रस्याला चव आहे.

सकाळी-सकाळी या हॉटेलवर मिळणाऱ्या पोहेचं देखिल अनेकांनी कौतुक केलंय.

दुपारच्या वेळेस तुम्हाल कचोरी बनवून मिळेल, बनवून म्हणजे कचोरी तयार असते, पण या कचोरीचे तुकडे करून त्यासोबत रस्सा तिला जातो, यामुळे कचोरी खाण्याची रंगत येते. ही हॉटेल मागील २५ वर्षांपासून अमळनेरकरांच्या सेवेत आहे.

पत्ता
अंबर रेस्टॉरंट
विजय मारूती मंदिरासमोर
धुळे रोड, अमळनेर

जालन्यातील वृंदावन मिसळ

जालना : एकनाथ घुगे यांची वृंदावन मिसळ ही जालना शहरात प्रसिद्ध आहे, मागील १५ वर्षापासून एकनाथ घुगे यांच्या मिसळीला जशी चव होती, तशी चव त्यांनी आजही कायम राखली असल्याने, जालन्यात आलेला माणूस आवर्जुन ही मिसळ खाल्याशिवाय राहत नाही.VRUNDAVAN_MISAL_JALNA_NEW

वृंदावन मिसळची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वृंदावन मिसळीत भरपूर देशी फरसाण असल्याने या मिसळीला अनोखी चव आहे, जालन्याला गेलात तर या मिसळचा नक्की आनंद घ्या.

पत्ता, वृंदावन मिसळ
कचेरी रोड, चाणक्य नगर
एकनाथ घुगे 9765915853

उत्कृष्ठ मिसळ…. झणझणीत पण… तेवढीच चविष्ठ

पुणे : टिळक रस्त्यावरून जाताना अभिनव कॉलेज चौक क्रॉस करून थोडेसे पुढे गेले कि डाव्या बाजूला आहे. (OKG)’ओकेजी’ खाऊगल्ली…

OKG_PUNE_NEWइथली सगळी मज्जाच वेगळी, गरमागरम पुणेरी मिसळ त्याबरोबर थंडगार ताक आणि ह्या अस्सल पुणेरी मिसळ (मटकी, पोहे, चिवडा, शेव, तळलेला बटाटा असे सगळेच चविष्ठ पदार्थ असलेली) चे खासियत म्हणजे अमर्यादित कांदा आणि रस्सा तेही फक्त ५० रुपयात.

सकाळी ८.३० वाजता सुरु होणारी मिसळ चे पातेले दिवसभरात कितीवेळा रिते होते ह्याचा हिशोब करणे सुद्धा अवघड जाते असे संचालिका सौ. अमृता गांधी ह्यांनी सांगितले.

मिसळ शिवाय बटाटावडा, समोसा, इडलीचटणी, पावभाजी, मिल्कशेक, मस्तानी, सॅन्डविच, भेळ, मटकी भेळ इत्यादी प्रकारही चालूच असतात.

ग्राहकाचे संपूर्ण उदरभरण आणि योग्य ती किंमत अशा सूत्रावर आधारित ही खाऊ गल्ली. कॉलेजच्या जाणाऱ्या ग्रुपसाठी असो, वा भिशी मधल्या पार्टीसाठी, हा एक सुंदर पर्याय ठरू लागला आहे.

इथली आकर्षक अंतर्गत सजावट आणि बैठक व्यवस्था आपणास एखाद्या खाऊ गल्लीतच घेऊन जाते. एकदा इथे मिसळ/पावभाजी/सॅन्डविच खाल्ल्यावर कदाचित एखादाच ग्राहक दुसरीकडे जायचा विचार करू शकेल.

पूर्ण पत्ता
(OKG) खाऊगल्ली उपहार गृह.
१०५७, टिळक रोड, अभिनव कॉलेज चौक, पंडित ऑटोमोटिवच्या समोर, पुणे ४११००२.
दूरध्वनी:- ९७६२०२५४२३KHAU_GALLI

पुण्यात मिळणारी ‘शेगाव कचोरी’

स्वप्नाली अभंग, पुणे | शेगावला गजानन महाराज यांच्या मठात अनेक भाविक येतात, पण शेगाव आणखी एका कारणासाठी प्रसिध्द आहे, ते म्हणजे इथं मिळणाऱ्या कचोरीसाठी. शेगावला गेल्यानंतर शेगाव कचोरी खाण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही.

आधी पोटाबा आणि मग विठोबा या म्हणीनुसार, शेगाव रेल्वे स्टेशनवर आलेले भाविक तुटून पडतात ते शेगाव कचोरीवर. पण पुणेकर मात्र खादाडीच्या बाबतीत सॉलीड लकी आहेत. बाहेर जाऊन आज काय खायच?, असा त्यांना कधीच प्रश्न पडत नाही. इतकी व्हरायटी पुण्यात मिळते.

पुण्यात शेगाव कचोरी मिळण्याचं ठिकाण

रमणबाग चौकात, गजानन कचोरी स्नॅक्स

shegaon kachoriयाच शेगाव कचोरीचा मोह झाला की, पुणेकर थेट गाठतात रमण बाग चौकातलं गजानन कचोरी स्नॅक्स सेंटर. गरमागरम खरपूस आणि तिखट चवीच्या या कचोरीच्या नुसत्या वासाने रस्त्यावरून जाणारे अनेक जण या कचोरीकडे वळतात.

अहो पुणेकरच ते नुसत्या वासावरून पदार्थ कसा झाला आहे हे सांगतील. त्यात जर त्यांच्या पंसतीला एकदा का एखादा पदार्थ पडला की, त्याला ते भरभरून दाद देतात ते त्या पदार्थावर तुटून पडून, असचं काहीस आहे या कचोरीच्या बाबतीत.

या कचोरीची खासियत आहे ती तीच्यात भरल्या जाणाऱ्या मुगाच्या डाळीच्या मसाल्यात. विदर्भात असलेली तिखटाची आवड लक्षात घेऊन यातला मसला ही तिखटच असतो. डोळ्यासमोर तयार होणाऱ्या कचोऱ्या आणी त्याला दिलेली चिंच, पुदीना आणि लसूण चटणीची जोड कचोरीची लज्जत आणखीनच वाढवते. राजस्थानी कचोऱ्या कधीच पंसतीस उतरल्या नाहीत पण शेगावी कचोरीच बात वेगळी आहे.

shree Gajanan Maharaj kachoriगेल्या सात वर्षांपासून रमणबाग चौकात असलेलं हे स्नॅक सेंटर आज अनेक खवय्यांचा अड्डा बनलं आहे. शनिवार, रविवार आणि गणेशोत्सवाच्या काळात या कचोरीला प्रचंड मागणी असते. गजानन कचोरीच्या खामगाव, अकोला, शेगाव इथं ही शाखा आहेत. दरोरोज इथं ७०० ते ८०० कचोऱ्या बनवल्या जातात.

अनेक जण कचोऱ्या घेऊन आपल्या नातेवाईकांना परदेशात ही पाठवतात. आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ताजी खमंग आणि स्वादिष्ट कचोरी दिली जाते. कचोरी बरोबरच इथला डाळ वडा आणि कोंथिबीर वडी, समोसा आणि वडापाव ही फेमस आहे. इथल्या सगळ्याच खाद्यपदार्था चे दर खिशाला परवडतील असेच. प्रत्येक पदार्थं केवळ दहा रुपायात मिळतो.

शुक्रवार पेठेतली हेरंब मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे  | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड, तुळशी बाग इथली मनसोक्त खरेदी करून झाल्यावर पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर पुणेकर वळतात ते हेरंब हॉटेल मधल्या मिसळीकडे.

पत्ता हेरंब मिसळ, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली

वेळ सकाळी ९ दुपारी ३ वाजेपर्यंत

रविवारी हॉटेल बंद

heramba misal pune

शुक्रवार पेठ शेवडे गल्लीतलं हे मिसळ आणि बटाटेवडासाठी प्रसिध्द असणारं हॉटेल आज अनेकांच्या तोंडावर आहे. मटकी, बटाटयाची भाजी, पोहे, शेव चिवडा, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो कांदा आणि तर्रीचा लाल रस्सा पाहुन तोंडाला पाणी सुटतं. थोडीशी आबंट गोड असणाऱ्या या मिसळीचा झटका ही न्यारा.

मिसळीसाठी लागणारा मसाला चांगला परतला जातो, अगदी दुकानात बसलेल्या ग्राहकांच्या पोटातला अग्नी या खमंग मसाल्याच्या वासाने अधिकच भडकतो. इथं मिसळी बरोबर स्लाईस ब्रेड दिला जातो. आणि विशेष म्हणजे एक्स्ट्रा कांद्यासाठी एक्स्ट्रा पैसे ही पडत नाही.

 चार वर्षापूर्वी विठ्ठल लक्ष्मण रानडेंनी सुरूवात केली

heramb snaks

पुणेकर एक्स्ट्राचा कांदा फुकट मिळाला की जाम खूश होतात. अवघ्या चार वर्षांपूर्वी विठठल लक्ष्मण रानडे यांनी सुरू केलेल्या या हॉटेल ला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.

मिसळी बरोबरच इथला बटाटेवडा, कांदा पोहे, उप्पीट, कांदा भजी, पाव सॅम्पल हे पदार्थ ही लोकप्रिय आहे. इथलं विशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक पदार्थांवर कांदा, आणि ओलं खोबरं घातलं जातं अगदी बटाटे वड्यावर ही.

इथल्या पदार्थांवर ताव मारून झाला की, बिल देताना विठ्ठल काका ग्राहकांच्या हातात एक कागद देतात त्यात असतात रूटिनला सामोर जाण्यासाठी काही उत्साहवर्धक टिप्स.

इथं मोठ्या ऑर्डरनुसार मिसळ पार्सल ही दिली जाते. सकाळी ९ ला सुरू होणार दुकान दुपारी ३ वाजेपर्यंत उघडं असतं. रविवारी मात्र हे हॉटेल बंद असतं.

आम्हाला तुमच्या हॉटेलची माहिती मेल करा [email protected]

बिबवेवाडीचं चिटणीस लंच होम

non-veg - Copyस्वप्नाली अभंग, पुणे | पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेटल, थाई, इटालीईन सगळं चाखून झालं. आता जिभेला काहीतरी नवीन पाहिजे बॉस. ते ही चवदार आणि लज्जतदार, मग काय पुणेकरांची आपसूकच पावलं वळतात ती चिटणीस लंच होमच्या सीकेपी पदार्थांकडे.

पुण्यात खवय्येगिरी करण्यासाठी तोटा नाही तरीपण या खाद्यजत्रेतली सारस्वती पदार्थांची उणीव भरून काढली ती बिबेवाडीच्या ’चिटणीस लंच होम’ नी.

भारवा पापलेट, सीकेपी कोळंबी खिचडी, सीकेपी सोड्याची खिचडी, सीकेपी कोळंबीचे लिप्ते, सुकट चटणी, खेकडा थाळी, अशा अनेक सीकेपी पदार्थांनी भरगच्च भरलेलं चिटणीस लंच होमचं मेन्यूकार्ड पाहून पदार्थ डिसाईड करण्यासाठी अर्धा तास नक्की लागतो.DSC_7844

समजतच नाही कोणत्या पदार्थावावर ताव मारावा इतकी व्हरायटी. खेकडा करी, कोळंबी खिचडी, भारवा प्लेट अप्रतिम.

तसंही नाष्ट्यामध्ये दाक्षिणात्य पदार्थ तर जेवणात पंजाबी, गुजराती, राजस्थानी पदार्थांनी बाजी मारली दिसते. वर इटालीय़न, चायनीज, थाय हे फॉरेनर्स आहेतच की, मग आपले महाराष्ट्रयीन पदार्थ मागे का? पण अशी हॉटेल्स पाहिल्या नंतर मन को सुकन आता है.

इथलं वैशिष्ट्य म्हणजे सुकी मासळी आणि त्याची करी ही अ‍ॅवेलबल. सुक्या मासळीचे प्रकार सहजासहजी कुठे मिळत नाही पण इथं मात्र सुका खेकडा, बोंबील चटणी पासून ते चिकन सुक्का पर्यंत सगळे पदार्थं मिळतात. इथलं लिप्ती कोळंबी भरून फ्राय केलेले भारवा पापलेट म्हणजे खव्वयांचा विक पॉईंट्च म्हणावा लागेल.

य़ा लंच होम चे मालक बाबा चिटणीस म्हणतात कि, “लंच आणि डिनर मध्ये पंजाबी किंवा कॉन्टीनेटल पदार्थांनी बाजी मारलेली दिसते. यात महाराष्ट्रीयन पदार्थ मागे पडत चालेले आहे.chitnis lunch home

ऑन्थेटिक आणि घरगुती सीकेपी पदार्थ खवय्यांना मिळावेत, म्हणूनच चिटणी लंच होम सुरू केले. अजिनोमोटो खाऊन लोकांना अजीर्ण होऊन अ‍ॅसिडीटी इतर त्रास सुरू झालेत, पण आमचे पदार्थं उगीचच झणझणीत आणि चमचमीत नसतात. पदार्थांची नेमकी चव कळते.”

इथले सगळेच पदार्थ खिशाला आणि पोटाला सोसवतील असेच आहेत बरं का. घरघुगती मसाल्यांच्या जोडीला ओल्या नारळाचा भरपूर वापर यामुळे इथल्या पदार्थांना होमली फिल येतो. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मासांहारी पदार्थां इतकीच शाहकारी पदार्थांमध्ये व्हरायटी.

वाग्यांची भाजी, आळू भाजी, पिठलं, वालाचं बिरडं, मटकी उसळ, आख्या मुसराची आमटी अगदीच फक्कड. ताबंड्या पांढऱ्या रस्स्याबरोबरच सोलकढी वर तुटून पडतात खवय्ये.

२० वर्षांपासून या व्यवसायात असलेले बाबा चिटणीस तसे स्वत: खवय्ये आणि याच खवय्येगिरीतून चिटणीस लंच होम चा जन्म झाला. घरागुती मसाले आणि सीकेपी चव याचां मेळ साधत खवय्यांना सीकेपी पदार्थांचं नवं खाद्यदालन आता उपलब्ध झालं आहे.

हिराबाग चौकातली उपवासाची मिसळ

स्वप्नाली अभंग/ पुणे

चार्तुमास म्हणजे व्रत वैकल्याचा महिना. उपावास आणि सात्विक भोजना मुळे आपोपच खाण्यावर काही बंधन येतात. पण खाणं आणि पुणं हे समीकरण भारतातच नाही तर जगप्रसिध्द आहे. त्यातून मिसळ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. पण उपवासाच्या दिवशी मिसळीला आवर घालणं तसं जरा कठीणच नाही का? लालभडक तर्री असलेली मिसळीची प्लेटसमोर आली तरी ती खाण्याचा मोह होतोच.

नाही नाही उपवास मोडण्याच महापाप अजिबात करू नका. उपवासाच्या दिवशी लाल तर्रीची मिसळ खाण्याचा मोह झाला तर पुण्यातलं थेट हिराबाग चौक गाठा. टिळक रोड नजीक असणारा हिराबाग चौक तसा फेमस.

Image

इथल्या खाऊ गल्लीत सकाळच्या न्याहारीसाठी जाम झूबंड उडते. इथं तुम्हाला अमित स्टॉलवर लाल तर्रीची उपवासाची मिसळ मिळेल. काय झालात ना खूश. अहॊ ’पुणे तिथे काय उणे’ ही म्हण काय उगाचच आहे काय?

 साबुदाण्याची खिचडी, बटाटयाची भाजी, अख्या शेंगदाण्याची लालभडक आमटी, बटाटाच्या तिखट चिवडा. बटाटाच्या शेव आणि शेंगदाणे वाटून तयार केलेली गोड आमटी काय हुआ ना दिल खूश. मी तर म्हणते या मिसळीसाठी उपवासची वाट कशाला बघायची. लिहितानाच ( आय मीन टू से टाईप करताना)  तोंडाला पाणी सुटतयं तर वाचताना किती सुटेल. याचा विचार तुम्हीच करा.

या स्टॉल वर मिळणाऱ्या उपवासाच्या सगळ्याच पदार्थांवर खव्वयांच्या उड्या पडतात. उपवास असो किंवा नसो. त्यातून उपवासाची मिसळ म्हणजे अनेकांची फेवरेट. या मिसळीचे जनक अमित खिलारे यांना खाण्यात काहीतरी नवीन प्रयोग करायचा होता. खिचडीत उसळ टाकून केलेली मिसळ सगळ्यांनाच आवडली. नवरात्रात इथं मिळणारी उपवासाची थाळी ही अप्रतिम असते. या व्यतिरिक्त उपवासाची भेळ. वडा सांबार पॅटिस (उपवासाचेच बरं का), खिचडी काकडी पदार्थ मिळतात.

आता मला कळलं एकादशी आणि दुप्पट खाशी का म्हणतात ते.

कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू
राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू

सचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ आणि आपल्या राजाभाऊंची नाद खुळा भेळ….

ताबंडा- पांढरा रस्स्याचा स्वाद चाखायचा आहेच, (म्हणजे इथं तो फक्त वाचता येईल), पण त्याआधी आपण राजाभाऊंच्या भेळबद्दल बोलू.

कोल्हापुरात या आणि कुणालाही विचारा,  “भावा राजाभाऊची भेळ कुठं रे”? मग लगेचच तुम्हाला ढगाएवढे हात करून, त्या दिशेकडे हात दाखवून आणि भावाच्या सादेला त्याच प्रेमाने साद देत, पत्ता सांगितला जाईल.

तर राजाभाऊची भेळ पूर्वी भवानी मंडपात सुरू झाली होती. आता ती केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाजवळ आहे. जागा बदलली असली, तरी चव तीच आहे. बऱ्यापैकी मोठा गाडा, पांढरे शुभ्र कपडे घातलेले कर्मचारी आणि गाड्याभोवती जमलेली गर्दी, असा राजाभाऊ भेळचा लवाजमा.

राजाभाऊंच्या भेळबद्दल प्रत्यक्ष मी पामराने काय सांगावं?  जावं आणि खाऊन यावं, एवढं साधं वर्णन करता येईल.

तिथे गेल्या गेल्या चुरूचुरू कांदा चिरणारे कर्मचारी, आणि गर्दीला त्याच कौशल्याने हाताळणारे रविंद्र बापू दिसतील. रविंद्र बापू हे राजाभाऊंचे चिरंजीव. त्या गर्दीतूनच, दादा, ताई या, कोणती भेळ देऊ, किती (क्वॉन्टीटी) हवी, वगैरे हे आपुलकीने विचारणं आलंच.

पण जास्त लक्ष वेधून घेतं, ते वाऱ्यावर उडणाऱ्या गवताच्या पात्याप्रमाणे, चलाखीने हलणारे त्यांचे हात. इतक्या वेगाने हलणारे हात, इतकी रुचकर, स्वादिष्ट भेळ कशी काय बनवू शकतात?, हा सुद्धा एक प्रश्नच उद्भवतो.

भेळीचा एक घास तोंडात घातल्यानंतर, तो कधी खाल्ला जाईल, आणि दुसरा घास कधी घेऊ, याची गडबड मनात झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी.

प्रत्येक ठिकाणच्या भेळीचं असं वैशिष्ट्य असतंच, तसं या भेळीचंही आहेच. पण हे ज्याने-त्याने खावं आणि आपापलं असं वैशिष्ट्य ठरवून टाकावं….

या मग एकदा कोल्हापूरला आणि राजाभाऊंची भेळ खाऊन पाहाच…

पुण्यातील खाद्यसौंदर्यांतली ‘गुर्जर मस्तानी’

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याचं आणि मस्तानीचं एक नातं आहे. इतिहासातील नाही तर खाद्यविश्वातील मस्तानी विषयी आम्ही बोलतोय. पुण्यात मस्तानी हे एक पेय आहे. पुण्यात सुजाता आणि गुर्जर या सर्वात जुन्या मस्तान्या. मस्तानी हा दुधापासून तयार करण्यात आलेला पदार्थ आहे.gujar bajirao mastani pune

मस्तानी ऑरेंज, पायनॅपलचा सिरप आणि आयस्क्रीम टाकून तयार करण्यात येते. ग्लासात मस्तानी जेव्हा सर्व्ह केली जाते. तेव्हा मस्तानीचं सौदर्यं काही औरच असतं. तेव्हा मस्तानी पेय आवडलं नाही, असं सांगून गुस्ताखी करणारा एकही पुणेकर तुम्हाला शोधून सापडणार नाही.

मस्तानी तुम्हाला चमचा अथवा स्ट्रॉने ही खाता येते. यातील एक पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. बाजीराव पेशव्यांचं मन मस्तानीनं जिकंल होतं. त्याप्रमाणे नव्वद वर्षांपासून पुण्याच्या खवय्यांच्या मनावर गुर्जर पेठेतल्या मस्तानीनं अधिराज्य गाजवलं आहे.

गुर्जर मस्तानी
पुण्यातील गुर्जर मस्तानी हाऊसमध्ये मस्तानी नांदतेय. मस्तानीच्या चवीचं सौदर्य़ं मनामनात खऱ्या अर्थानं गुर्जर मस्तानीने रूजवलं. मस्तानीची मुहूर्तमेढ बाबुराव गुर्जर यांनी 1923 साली रूजवली. बुधवार पेठेत हे मस्तानी गुर्जर हाऊस आहे.

मस्तानी विविध फ्लेवर्समध्ये मिळते. बटरस्कॉच, पिस्ता, आंबा, मलाई, कॉफी आणि कॉफी चॉकलेट अशा अनेक प्रकार उपलब्ध आहेत. थंडाई आणि खस या जराशा हटके मस्तानीही आहेत.

बाजीराव मस्तानीची बातच न्यारी
बाजीराव मस्तानी या मस्तानीची तर बातच न्यारी. या मस्तानीला सर्वाधिक मागणी असते. मस्तानी बरोबरच इथली कुल्फी आणि फालुदेही अप्रतिम. वैविध्यपूर्ण फ्लेवर्स आणि ताजेपणा यामुळे गुजर मस्तानी आजही ग्राहकांचा विश्वास टिकवून आहे.

गुर्जर मस्तानीच्या शाखा
या मस्तानीच्या हडपसर, सातारा रोड आणि बुधवार पेठ या ठिकाणी शाखा आहेत. पुण्यामुबंई बरोबरच चेन्नई आणि बंगलोर येथेही मस्तानीला प्रचंड मागणी आहे. तिथे खास आइस बॉक्समधून मस्तानी पाठवली जाते.

मस्तानीच्या किंमती ही जवळपास ६५ पासून सूरु होतात. काही ठिकाणी फुल आणि हाल्फची सोय आहे. पण मसतानीच्या एका ग्लासात पोट ही भरतं आणि मनं ही तृप्त होतं.  म्हणूनच पुण्यात आल्यावर मस्तानी तर मस्ट है बॉस.

SPDP आणि खास्ताचाट

khasta chat, SPDP
खास्ता चाट

स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्यात खादाडीला भरपूर वाव असला तरी चाटच्या बाबतीत  जरा कमतरतातच जाणवते.

अस्सल मुंबईकर वडापाव आणि पाणीपुरी किंवा इतर चाट आयटमशी आपलं नातं कधीच तोडत नाही. पण पुण्यात जरी या गोष्टीची कमतारता जाणवली, तरी चाटमधील जरा हटके प्रकार (जे मुबंईत मिळत नाही) चाखायला मिळाले. ते म्हणजे SPDP आणि खास्ताचाट. आहे की नाही पुणेकरांसारखीच भन्नाट नावं.

कुठे मिळतं खास्ता चाट?

सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ, राहळकर राम मंदीराच्या अगदी शेजारीच असणाऱ्या स्वामिनी चाट सेंटरमध्ये खास्ता चाट मिळतं.

‘खास्ता चाट’ हे या चाट सेंटरचे चाट पदार्थांमधलं नवीन इनोव्हेशन. या इनोव्हेनला ग्राहकांचा प्रतिसाद तुटून पडण्याइतका.

खास्ता चाटमध्ये खास्ता पुऱ्या म्हणजे खरपूस, अनेक पदर असलेल्या खाऱ्या पुऱ्या आणि रगडा, चिंच, पुदीनाच्या चट्ण्या, पाणी पुरीच पाणी, ताजं दही टाकून केलेलं अनोखं कॉम्बिनेशन असतं. या खास्ता चाटची क्वॉनटीटी ही पोट भरेल इतकी.

या खास्ता पुरीला गुजराती आणि पंजाबीत मट्टी पुरी तर सिंधीत खास्ता असं म्हणतात. मराठीत या पुरीला खारी पुरी म्हणतात. अशा या पुरीच चाट कॉम्बिनेशन अफलातून आहे.

याच चाट सेंटरमध्ये मिळणारा आणखी एक चाट प्रकार म्हणजे SPDP. हा प्रकार पुण्यात बऱ्याच ठिकाणी मिळतो. पुणेकर खव्य्यांची पसंती पाणीपुरी पेक्षा ही जरा अधिक SPDP लाच असते. SPDP म्हणजे शेवपुरी आणि पाणीपुरी याचं कॉम्बिनेशन.

पाणी पुरीच्या पुरिमध्ये शेवपुरीचं मटेरियल टाकून वरतून दही आणि पाणीपुरीचं पाणी टाकण्यात येते. पहिल्यांदा SPDP खाणारा प्रत्येक या पदार्थांचा कायमचा फॅन होतो. या दुकानात हायजिनकडे विशेष लक्ष दिल्यामुळे काही-बाही सशंयाचे कीडे उगाचच वळवत नाही.

मराठी माणसाची ‘मराठी मिसळ’

स्वप्नाली डोके, पुणे | दर मैलावर भाषा बदलते असं काहीस पुण्यात मिसळीच्या बाबतीत म्हणावं लागेल. मिसळींमध्ये खूप अप्रिम व्हारायटी उपलब्ध आहे. नुकतीच मराठी मिसळ खाऊन बघतली. या मिसळीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि टेस्ट केल्यावर त्याची प्रचिती ही आली.

Marathi Misal puneमिसळ एक परिपूर्ण आहार’ हे टॅग लाईन असलेली पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट.

अप्रतिम चवीबरोबरच ही मिसळ विक्रमासांठी ही नावाजलेली. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर असणाऱ्या आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

थोडीशी गोड आणि तिखट असणाऱ्या या मिसळीच्या एका प्लेटमध्ये हमखास पोट भरतं. पुण्यातल्या मिसळीमध्ये या मिसळी ने आपलं वेगळेपण जपलं आणि सिद्ध ही केलं.

मटकी, बटाटा, कांदा पोहे, चिवडा, शेव, ओलं खोबरं आणि कोथींबीर आणि तर्रीचा रस्सा ये सारं पाहून तोंडाला पाणी सूटतं. इथं खव्य्यांना वेगळी चव मिळते पण त्याबरोबरच हा पहिल्यांदा येणारा खवय्या हा नंतर या मिसळीचा नियमित ग्राहक बनतो.
मराठी मिसळ
या मिसळीच आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ही मिसळ छोट्या परातीत मिळते, त्यामुळे मिसळ मिक्स करायला ऎसपैस जागाही मिळते. राजकीय नेते, कलाकार, इतिहास संशोधक, तरूण, तरूणी यांचा तर हा फेवरेट मिसळ कट्टा.

रोज ३५० ते ४०० ग्राहक या मिसळीचा आस्वाद घेतात. रविवारी हाच आकडा ५०० ते ६०० च्या घरात पोहचतो. या मिसळी चे मालक आशोक जाधव म्हणतात. आमच्या मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे ती थंड पडल्यावर ही तितकीच चवदार लागते.

जाधव याचं संपूर्ण कुटुंब मिसळ प्रेमींना अप्रतिम चवीची मिसळ देण्यासाठी तत्पर असतं. जाधव यांच्या पत्नी स्वत: मिसळीसाठी मसाले बनवतात. अशोक जाधव यांनी मिसळ बनवण्याचं तंत्र स्वत: विकसित केलं आहे, आणि रोज ते स्वत: ही मिसळ बनवतात, त्यामुळे या मिसळीच्या चवीत कधीच बदल होत नाही.

ही मिसळ खाल्ल्यानंतर नाक आणि डोळ्यातून पाणी ही येणारा नाही, आणि जळजळ होणार नाही. यामुळे पुढ्यातल्या मिसळीच्या प्रत्येक घासाचा आस्वाद ग्राहकांना घेता येतो. यामुळे आबालवृध्द ही मिसळीवर तुटून पडतात.

विक्रमी मराठी मिसळ
चवी बरोबरच अनोखे विक्रम आणि ’मराठी स्कीम’ साठी ही मिसळ प्रसिध्द आहे. २०११ ला भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामान्याच्या वेळी भारताच्या विजया निमित्त मराठी मिसळ एकावर एक फ्री मिसळ देण्यात आली होती. त्यावेळी १५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच मिसळ फ्री ही देण्यात आली. त्या दिवशी हॉटेलच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

ट्रॅफिक ही जाम झालं होतं. ही बातमी अगदी साता समुद्रा पार ही पोहचली. सचिन तेंडुलकरच्या महाशतकालाही जाधव यांनी एकावर एक फ्री मिसळ देण्याचा निर्णय घेतला.

याला खवैय्यांनी उदंड प्रतिसाद दिला, ३५ हजार मिसळीची विक्री झाली आणि तितकीच फ्रि देण्यात आली होती. अशोक जाधवांचा हा उपक्रम एक विक्रमच म्हणावा लागेल. या हॉटेलमध्ये जैन मिसळ ही आहे. या हॉटेल ची आणखी ऎक इंटरेस्टिंग स्कीम म्हणजे इथं येणाऱ्या स्त्रीयांना गजरा ही देण्याची अनोखी मराठी स्कीम इथं आहे.

पत्ता
पुण्यातल्या सदाशिव पेठेतली ’मराठी मिसळ’ म्हणजे पुणेकरांचा विक पॉईन्ट. भरतनाट्य मंदिराच्या अगदीसमोर आदित्य हॉटेलमध्ये ही मराठी मिसळ मिळते.

पौष्टीक इडलीचं उदय विहार

vegस्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’

uday vihar pune“बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर ऑर्डर दिलेला पदार्थ येतो.

टिळक रोडवरच्या एस.पी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या उदय विहार या छोटेखानी ‘स्नॅक सेंटर’मध्ये जादुई वाटावं, असं हे नेहमी दिसणारं चित्र. इडली बरोबरच खिचडी, मिसळ, पोहे, उपमा, एस.पी.डी.पी या पदार्थांवर सगळेच तूटुन पडतात.

पौष्टिक नाश्ता
पौष्टिक इडल्या इथली खासियत. टपोऱ्या इडल्या मध्येच मटार, गाजर, फ्लॉवर आणि थोडासा मसाला असं मस्तं पौष्टिक कॉम्बीनेशन इथं चाखायला मिळतं. या इडल्या बरोबर ओला नारळ आणि डाळं असलेली चटणी मिळते.

थोड्याशा पिवळसर असणाऱ्या या इडल्यांमध्ये वाफवतानाच या भाज्या घातल्या जातात. या इडल्यांची चव ही अगदी अप्रतिम आहे. इडली बरोबरच ‘उदय’च्या पोहे, उपमा, बटाटे वडा, खिचडी आणि मिसळ हे पदार्थ एकदम फर्स्ट क्लास असतात.

कांदा पोहे त्यावर ओला नारळ आणि शेव या पोह्यांच्या एका प्लेटमध्ये कदाचित पोट भरतं. इथलं उपीट तर अप्रतिम. बारीक रव्याचं थोडसं पातळसर आणि त्यावर शेव, हे डिश खाल्यानंतर झकास हा शब्द आपसूकच ओठांवर येणार. इथल्या खाद्यपदार्थांवर ताव मारल्यानंतर कोकम सरबत, पन्हं, ताक ही मराठमोळी पेयं ही उपलब्ध आहेत.

साठ वर्षांचे साक्षीदार
उदय विहार १९५४ साली सुरू झालं, आणि आजही आपली खासियत टिकवून आहे. केवळ १०० स्क्वेअर फूटांच्या जागेत असलेल्या या हॉटेलच्या पदार्थांची जादू काही औरच आहे.

या स्नॅक सेंटरचे मालक उदय लवाटे वयाच्या साठीतही आलेल्या गिऱ्हाकांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करतात. या स्नॅक सेंटरच्या समोरच एस.पी कॉलेज आहे. त्यामुळे एस.पीच्या विद्यार्थी आणि स्टाफचा हा फेवरेट खाद्य कट्टा.

विद्यार्थी कॉलेजचे माजी विद्यार्थी झाले, तरी आपल्या या कट्ट्याला मात्र विसरत नाहीत. इडली, पोहे, आणि उपमा यांची चव घेण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून ते उदय काकांकडे येतात.

हे सारे अप्रतिम चवीचे पदार्थं बनवण्याचं श्रेय जातं, ते उदय काकांच्या पत्नी रिमा लवाटे यांना. यामुळे चवीत आजतागायत बदल झालेला नाही.

पुण्यात आल्यानंतर खास ‘उदय विहार’मध्ये नाष्टा करायला येणारे अनेक जण आहेत. अगदी सकाळी ८.३० सुरू होणारं हे स्नॅक सेंटर रात्री ९ पर्यंत चालू राहतं. शिवाय इथल्या पदार्थांचे रेट हे ३० रुपयांच्या आत आहे.

‘साईछाया’ची काळ्या रस्स्यातली मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे
पुण्यातल्या खवय्यांची मिसळीला पहिली पसंती असते. पुण्यातल्या पुण्यातच मिसळींची भरपूर व्हारायटी मिळते. विशेष म्हणजे हे मिसळ प्रेमी हटक्या चवीला भरभरून प्रतिसाद देतात.

लाल तर्रींबाज रस्स्याच्या मिसळीनंतर आम्ही शोध लावला, तो काळ्या तिखटातील गावरान काळ्या रस्स्याचा मिसळीचा. काळया तिखटाचा रस्सा, शेवपापडी, चिवडा, कांदा, टॊमॅटो, लिंबू आणि हिरव्या मिरच्या, लुसलुसीत पाव जोडीला, तळालेला पापड आणि चॉकलेट कॉफी. आणि हे सारं पोट भरेल इतकं.

पुणे-सातारा महामार्गावर

पुणे-बंगलोर महामार्गावरील भोर तालूक्यातल्या वेळू गावातल्या साईछाया मिसळीचं. साताऱ्याकडे जाताना कात्रज घाट ओलांडला की, अवघ्या ४ कि.मी हे मिसळ हाऊस आहे.sai misal pune

या गावरान ठसक्याच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी पुण्यातले मिसळचे दर्दी हमखास हजेरी लावतात. तसेच पुणे-सातारा महामार्गावरचे बहूतेक प्रवासी आपली खासगी वाहनं हमखास थाबंवून मिसळीसाठी ब्रेक घेताताच. साईछायाच्या समोरच प्रसिध्द भेळ आणि मिसळीचं दुकानं आहे

या मिसळ हाऊसचे मालक मंगेश काळे हा युवक मूळचा वेळू गावचा, पण त्याच लहान पण गेलं ते जेजूरीत. मामाकडे राहत असताना त्यांनी हॉटेल व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. आपल्या मूळ गावी परतल्यावर त्यांनी साईछाया मिसळ हाऊस सुरू केलं.

स्वप्न चवदार मिसळीचं

तरूण वयात मुलं डॉक्टर, इंजिनयर बनण्याची स्वप्न बघतात, त्याच वयात मंगेश नी व्यवसाय करण्याचे ठरवले तेही हॉटेलिंग ईड्स्ट्रीतच. म्हणूनच मराठ्मोळा पदार्थं निवडून नवीन चव ग्राहकांना देण्याचा प्रयत्न मंगेशने केला.

सुरवातीला अल्प प्रतिसाद मिळला पण हळू हळू दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली. आता तर अनेक जण कर्याक्रमांसाठी इथून मिसळ पार्सल नेतात.

गावरान रस्सा

या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे काळा कडक गावरान रस्सा आणि थोडीशी आंबट्सर चव.सिझन प्रमाणे मिसळीबरोबर खवय्यांनाबी काहीतरी नवीन डिश देण्याचा या मिसळ हाऊसचा प्रयत्न असतो.

आता तर साईछायाला अनेक जण बर्थ-डे आणि विकेन्ड सेलिब्रेट करायला ही येतात. तर ही गावरान ठसक्याची मिसळ एकदा तर ट्राय करायलाच हवी.

हॉटेलचा पत्ता
वेळू तालूका भोर जिल्हा पुणे
पुण्याहून साताऱ्याकडे जाताना कात्रज घाटापासून ४ कि.मी अंतरावर
इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ.

मिसळची १ प्लेट ५० रुपये विथ अनलिमेट्ड रस्सा (2013)

सोलापूरची सुगरण

ज्ञानदा चव्हाण

आपल्या आजूबाजूला खूप हॉटेल्स असतात, पण जिथे जाऊन खरचं जिभेचे चोचले भागवता येतात आणि चविष्ट जेवण जेवल्याचं समाधान मिळतं अशी खूप कमी हॉटेल्स आहेत.. मी फारशी फिरत नाही, पण मी जेवलेल्या हॉटेल्सपैकी माझ्या मनात घरं केलेलं होटेल म्हणजे सोलापूर मधलं सुगरण.. गेल्या वर्षी कामानिमित्त सोलापूरला गेले असताना या हॉटेलची आणि माझी पहिली ओळख झाली आणि तेव्हापासून मी इथल्या स्वादिष्ट जेवणाच्या प्रेमात पडलेय…Image

आमचे एक स्नेही आमच्या पूर्ण टीमला आग्रहानं या सुगरण मध्ये घेऊन गेले, आम्ही सगळे प्रवासानं अतिशय थकलेले असल्यामुळे कुणी फार काही प्रश्न विचारले नाहीत, सुगरण मध्ये पोहचल्यावर कळलं की ही खानावळ कम हॉटेल आहे, लाकडी बाकं-टेबलं, त्यावर ठेवलेले स्टीलचे जग आणि पाण्याचे ग्लास आणि सततची वर्दळ.. भूक खूप लागली होती, आम्ही काही ऑर्डर करण्याआधी आमच्या स्नेहींनी आमच्यासाठी खवा पोळीची ऑर्डर देऊन टाकली, हा काय प्रकार असेल याच्या विचारात असताना गरमा-गरम, खरपूस भाजलेली, तूपाची धार सोडलेली यम्मी खवा पोळी समोर आली, पहिला घास तोंडात आणि साऱ्यांचे चेहरे आनंदले, खरतरं जेवणाच्या सुरवातीलाच आम्ही डेझर्ट खात होतो पण या एका घासावरून या हॉटेलचं नाव सुगरण किती सार्थ आहे याची जाणीव झाली.. इतकी सुंदर खवापोळी मी आयुष्यात कुठेही खाल्लेली नाही…

सुगरणचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे, सुगरण मध्ये किचन पासून गल्ल्यापर्यंत सगळी कामं बायकाच पाहतात,अगदी जेवण वाढणाऱ्या मावशी सुद्धा घरातल्या पंक्तीत असलेल्या माणसाला करतात तसा प्रेमळ आग्रह.. सुगरण मध्ये थाळी सिस्टिम आहे, पोळ्या, दोन भाज्या, वरण, डाळ, भात, एखादं स्वीट, दही आणि या भल्या मोठ्या थाळीसोबत, चटणी, काकडची खमंग कोशींबीर,लोणचं, सोलापूरची खासियत असलेली शेंगा चटणी असं साग्रसंगीत सजवलेलं ताट तुमच्या समोर येतं, अशी मेजवानी समोर असताना तोंडाला पाणी सुटलं नाही तरचं नवल…

तुम्ही मोठ्या थाळीची ऑर्डर दिलीत की अनलिमिटेड जेवण, पण ताटात टाकायचं मात्र काही नाही… पण जेवणचं इतकं सुग्रास असतं की पानात काही शिल्लक ठेवण्याचा सवालच नाही..

सुगरण मध्ये काहीही खा, जेवण एकदम फर्स्ट क्लास, खवापोळी तर अप्रतिमच पण त्याचसोबत सोलापूरची खास शेंगापोळी, ऑल टाईम फेव्हरीट पुरणपोळीची चव चाखायला हरकत नाही.. सोलापूरकरांपेक्षा सुगरण मध्ये इतरांचीच गर्दी जास्त, स्टेशनच्या अगदी जवळच असल्यानं आधी सुगरण मध्ये भरपेट जेवा आणि मग ट्रेन पकडा हे तर जणू समीकरणच झालय… सोलापूरला जायचं असेल तर मला सुगरण आणि खवापोळीची कधी भेट होईल असं होत..

पण वर्षभरापूर्वीच्या सुगरणचं रूपडं आता पालटलंय, आता सुगरण बनलयं एक प्रोफेशनल हॉटेल, जिथे एसी, नॉन-एसी हॉल मध्ये बसून जेवण्याची सोय आहे, अंतर्गत सजावटपण अगदी चकचकीत, पण जुन्या रूपड्यात एक वेगळीच मजा होती… हा पण रूप बदलेलं असलं तरी चवीत मात्र नो कॉम्प्रोमाईज, जी चव वर्षभरापूर्वी तीच चव यावेळी पण चाखता आली.. खरंतर सोलापूरातल्या दूषित पाण्याच्या बातम्या एकून मी संपूर्ण सोलापूरात कुठेही पाणी पिण्याची हिंमत केली नाही पण का कोण जाणे सुगरणमध्ये टेबलावर असलेल्या जगातलं ( NO MINARAL WATER) पाणी पिताना माझ्यामनात कधीच शंका आली नाही, मी ते पाणी बिनधास्त प्यायले, कदाचित सुगरणचं घरपण आणि आपुलकी यातच दडलेली असावी.. कधी सोलापूरला गेलात तर सुगरण मध्ये अवश्य जेवा…

(ज्ञानदा चव्हाण, एबीपी माझाच्या एँकर आहेत)

दत्तुची ओली भेळ

भेळ आपली रविवारची संध्याकाळ चटपटीत करते. मुबंईत तर चौपाटी आणि भेळ याचं अतुट नातं आहे. पण शहरी बाजाच्या भेळीं पासून जरा हटके, अस्सल रांगडी आणि चविष्ट भेळ म्हणजे ओतूरच्या दत्तूची ओली भेळ.

मुंबई नगर महामार्गावर असणाऱ्या ओतुर गावातील दत्तूची चटकदार ओली भेळ गावकऱ्यांसाठी भूषण ठरली आहे. गावात येणाऱ्या पाहुण्यांना ही ओली भेळ चाखवायला गावकरीही उत्सुक असतात. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या भेळीने भौगलिक सीमा ओलांडून आपलं वैशिष्ट्य जपलं आहे.

मुरमुरे, त्यावर दोन प्रकारचे चिवडे, थोडी पापडी, कांदा, कोथींबर. त्यावर घट्ट चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरच्यांची चटणी हे कॉबिनेशन तयार होत असतानाचा नजारा ही अनोखा. अगदी कलात्मकतेने हे मिश्रण तयार केले जाते. त्यामुळे समोर आलेल्या भेळीची चव खाणाऱ्यांच्या जीभेवर कायम रेंगाळते. विशेष म्हणजे मटकी, टोमॅटो, कैरी या कुबड्यांची या भेळीला कधी गरजच पडली नाही.

ओतुर गावात १९६० च्या सुमारास दत्तात्रय खेत्री यांनी सुरु केलेल्या, भेळीच्या गाडीचे रुपांतर आता ४ दुकानांमध्ये झाले आहे. दत्तात्रय खेत्री यांची तीन ही मुलं सुनील, राजेंद्र आणि मंगेश आज या व्यवसायात आहेत.

दिवसाला २०० ते ३०० ग्राहक या भेळीचा आस्वाद घेतात आणि इतकीच भेळ पार्सल ही नेली जाते. आठवडी बाजार यात्रा, उन्हाळा, दिवाळी आणि लग्नसराई या दिवसात तर ही तीनही दुकानं गर्दीने ओसांडून वाहात असतात.

शहरात भेळ हा संध्याकाळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे, मात्र इथं दिवसभरात तुम्ही कधीही भेळीचा आस्वाद घेऊ शकता, कारण इथं येणारा प्रत्येक जण हा भेळीचा आनंद लुटण्यासाठी आलेला असतो.

मागणी प्रमाणे ही ओली भेळ पार्सल ही मिळते. पार्सलमध्ये चिंचेची आणि मिरचीची चटणी वेगळी पॅक करून दिली जाते. ओल्या भेळीबरोबर सुकी भेळ ही तितकीच चविष्ट. उत्तम प्रतिचा माल वापरल्यामुळे ही भेळ तीन आठवडे खराब होत नाही.

पुण्या, मुबंईचा चाकरमानी तसेच राज्यभरातून इथं शिकायला आलेले विद्यार्थी घरी जाताना द्त्तूची भेळ न्यायला विसरत नाही. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलं तिथं ही दत्तुची भेळ मिस करतात.

म्हणूनच मुलांच्या हटटामुळे त्यांच्या पालकांना हा भेळीचा खाऊ परदेशी कूरीयर करावा लागतो. काळाच्या ओघात या व्यवसायात बदल झाले, असले तरी या भेळीच्या चवीत आणि गुणवत्तेत काडीमात्र फरक झालेला नाही.

बादशाहीचा बादशाही थाट

स्वप्नाली अभंग, पुणे

खानवळ म्हटलं कि, डोळ्यासमोर येते ते पाणचट आमट्या, पातळ डाळ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र पुण्यातल्या टिळक रोडवरच्या बादशाहीचं मात्र असं नाही. चवीत आणि दर्जा याबाबतीत बादशाही ख्रोखरीच बादशाही आहे. इथ तीन तीन तास वेटिंग करणारे  अनेक जण नुसता बादशाहीचा आमटी भात मिळाला तरी धन्य मानतात कारण त्यांच्या मते बादशाहीच्या नुसत्या आमटी भाताने ही पोट भरतं आणि मनं ही समाधानी होतं.

आमटी, दोन भाज्या, फुलके, भात, लोणचे, कोशिंबीर, कांदा आणि ताक असं बादशाहीच्या थाळीचं स्वरूप आहे. शिवाय पाहिजे असल्यास गोडाचे पदार्थ मिळतात ज्याच्यासाठी ज्यादा दर आकारण्यात येतो. दर दिवशी आणि प्रत्येक वेळेला इथल्या भाज्यांमध्ये प्रचंड व्हरायटी असते. आळू आणि सूरण या भाज्यांपासून ते दोडक्याचा रस्सा आणि घेवड्याची सुकी भाजी इथपर्यंत अनेक भाज्या इथं चाखायला मिळतात. अनेक भाज्यांना नाकं मुरडणारी मंडळी इथल्या भाज्यावर मात्र तुटून पडतात. याचं कारण एकच बादशाहीची अफलातून चव.बादशाही खानावळ

परंपरा १९६७ पासूनची
१९६७ साली सुरु झालेली बादशाही खानावळ आजच्या मेक्सिकन, इटालीयन, अमेरिकन फूड कल्चरच्या जमान्यातही आपलं वेगळे पण टिकवून आहे. बादशाही चे मालक वामन नागेश छत्रे यांनी सात्विक अन्न, स्वच्छता, शिस्तब्द्ता याद्वारे बादशाहीचा आदर्श निर्माण केला. वामन छत्रे यांच्या नंतर त्यांचे पूत्र सदानंद छत्रे यांनी ही बादशाहीच्या या थाटात कसलाही खंड पडू दिलेला नाही. इथल्या पदार्थांची चव तर इतरत्र कूठेही मिळणार नाही.

कोकणी गोडवा
सदानंद छत्रे याच सारं श्रेय देतात ते आपल्या कर्मचाऱ्यांना. इथला कर्मचारी वर्ग आहे तो कोकणातला. अगदी आचाऱ्यांपासून ते वाढप्या परर्यंत सगळेच बादशाहीच्या प्रवासात अगदी सुरवाती पासूनचे.

त्यामूळेच पदार्थ तयार करण्यापासून तो वाढ्ण्यापर्यंत च्या प्रवासातला हा कोकणी गोडवा पदार्थंची लज्जत अधिकच वाढवतो.

बादशाहीची आमटी आणि ताक
आळुची भाजी, भरलेले वागं, भरीत, सुरणाची भाजी, वालची उसळ अशा इथल्या अनेक पदार्थांवर खवय्ये फिदा आहेत. इथली आमटी आणि ताक हे तर बादशाहिचं खरं वैशिष्ट्यं. भाज्यां मध्ये ओला नारळ सढळ हस्ते वापरले जातो. रात्री उशीरा आलेली माणसं केवळ आमटी भात ही चालेल असं म्हणून पार्सल नेतात तर आमटी नसेल तर ताक भाता वरही समाधान मानणारे आहेच.

केवळ चवीतच नाही तर इतर अनेक गोष्टीमूळे बादशाहीने आपलं बादशाहीपण सिध्द केलं आहे. जुन्या लाकडी खुर्च्या, टेबल, पितळी तांबे, ताटातील डाव्या उजव्याचा शिष्टाचार, सात्विक अन्न आणि जोडीला विविध भारती वरील जुनी गाणी यामूळे इथल्या वातावरणाला जो अ‍ॅण्टिक फिल येतो तो शब्दांत मांडण ख्रोखरीच कठीण आहे.

बादशाहीत नित्यनियामाने अनेक वर्षांपासून येणारे अनेक जण आहेत. आर.व्ही बोरकर हे तर १९७४ पासून बादशाहीत येतात. त्यांना इथल्या जेवणाची इतकी सवय झाली आहे की आता घरी गेल्या नंतर त्यांना घरचं ही जेवण आवडत नाही. विश्वासराव आठवले याचं असंच काहीसं ते गेली ९ वर्ष बादशाहीचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्या मते बादशाहीची पिठलं भाकरी आणि टोमॅटोच्या साराला तर तोड नाही.

या बादशाहीची ख्यातीच अशी की, कलाकार मंडळी आणि परदेशी पर्यट्कांना पुण्यात आल्यानंतर बादशाहीत जेवणाचा मोह आवरणं कठीण. अस्सल महाराष्ट्रीयन सात्विक अन्नाचा अस्वाद घेण्याकरता अनेक अमराठी लोक इथं गर्दी करतात.

बादशाहीचा सारा कारभार हा कडक शिस्तीतच चालतो. कूपन घेण्यापुर्वी आवडीच्या भाज्या आहेत की नाही याची चौकशी करावी, पानात अन्न टाकू नये, जेवताना मोबाईल वर बोलणं टाळावं अशा आशयच्या अनेक पाट्या दिसतील. तेव्हा बादशाहीचा हा बादशाही थाट अनुभवण्यासाठी बादशाहीत येणं तर मस्ट आहे.

बादशाही थाळी  ७० रुपये (2013)
गोड पदार्थांसाठी ज्यादा २५ रुपये
पार्सल थाळी ९० रुपये
वेळ दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८.३० ते १०
सोमवारी बादशाही बंद असते.

काटाकिरर मिसळ

पुण्यातलं खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे एकदम कडक कर्वे रस्त्यावरची काटाकिरर मिसळ.

तासाभरचं वेटिंग झालं तरी चालेल पण मिसळ चापल्या शिवाय मागे फिरायचं नाही असं इथं येणारे मिसळ प्रेमी म्हणतात. कडक कोल्हापूरी तर्रींचा रस्सा, फरसाण, त्यावर कांदा आणि लिंबू जोडीला दह्याची वाटी आणि मठठा सूध्दा.

katakir misalकडक रस्स्याने तोंड भाजलं तर दही आणि मठठा आहेच त्यामूळे ज्यांना तिखट सोसवत नाही त्यांच तिखट मिसळीचं मिशन ही सहज साध्य होतं.

मिसळीचा रंजक प्रवास
या काटाकिरर मिसळीचा प्रवास ही मोठा रंजकच आहे. अवघ्या पाच वर्षांपुर्वी सुरू झालेली काटाकिरर आज पुण्यातली सर्वात प्रसिध्द मिसळ झाली आहे. काटाकिरर चे प्रसाद आवटी हे मूळचे सांगलीचे.

आवटी यांनी बीएसी आणि एमबीए चे शिक्षण घेतलेले पण नोकरी करणं त्यांना पटलं नाही. मग त्यांनी अवघ्या हजार रुपायांच्या भांडवलावर गरवारे कॉलेज समोर मिसळीची छोटेखानी दुकान सूरू केलं. अल्पावधीतच इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा या मिसळीला चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळी सातपासून रांग
पण काही अडचणींमुळे जोरात चाललेलं हे मिसळ हाऊस आवटी यांना बंद करावं लागलं. पण लवकरच नव्या जागेत आवटी यांनी आपलं मिसळ हाऊस चालू केलं. या नव्या जागेचा माग काढत खव्य्यांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच रांगा लावायला सूरू केली. कूठचीही जहिरात न करता केवळ माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर अनेक मिसळ प्रेमी या  मिसळशी जोडले गेले.

कमालीची स्वछता आणि गुणवत्ता
कमालीची स्वछता आणि गुणवत्ता असा नावलौकिक असलेल्या या मिसळ हाऊस चा दिनक्रम सुरू होतो तो पहाटे ३ वाजता. आवटी स्वत: मिसळी साठी लागणाऱ्या ओल्या मसाल्याची फोडणी करतात.

मिसळीसाठी लागणारे गोडे मसाले त्यांच्या पत्नी घरी तयार करतात. गेल्या पाच वर्षांत मिसळ उरली असं कधीच झालं नाही. मिसळवर उपवास सोडणारे अनेक जण इथं पाहायला मिळतील.

गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे
इतकचं नाही तर गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे लागतात. आणि हे डोहाळे पूर्ण करण्यासाठी अगदी नवव्या महिन्यात ही महिला आपल्या पतीसोबत येतात. काटाकिरर ची वाढती मागणी लक्षात घेऊन आवटी यांनी जयसिंगपूरला शाखा सुरू केली. लवकरच अन्य ठीकाणीही शाखा सूरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

ओतूरच्या फकीरभाईंचा प्रसिद्ध पेढा

(स्वप्नाली अभंग ) कोणतंही शुभ कार्य ठरलं, अपेक्षित, अनपेक्षित लाभ झाला, तर आनंद पेढे वाटून साजरा केला जातो. प्रसादात तर पेढ्यांना मानाचं स्थान असतं. तसा हा पेढ्यांचा ‘गोड योग’ प्रत्येकाला आयुष्यात अपेक्षित असतो.

मात्र हा दुग्धशर्करा योग साजरा करण्यासाठी पेढाही तसाच हवा, चविष्ट नाही तर चांगल्या गोड क्षणाचीही चव जाते. प्रवासाला किंवा गावाला गेला होता, तर काय आणलं?, असंही विचारलं जातं. तेव्हा चांगले पेढे घेऊन जाणे कधीही चांगलं.

पुणे जिल्ह्यातील ओतूरचा प्रसिद्ध पेढा
otur pedhaओतूर पुणे जिह्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलं आहे . मूबंई-अहमदनगर महामार्गावरचं हे गाव तसं फक्त तसं पेढ्यांसाठीचं प्रसिद्ध नाही. तर ते अनेक कारणांसाठी प्रसिध्द आहे. त्यातलं एक गोड कारण फकिर भाईंचे पेढे. रूढ अर्थाने या पेढ्यांचे नामकरण फिकारयाचा पेढा असं झालं आहे.

ओतूर एस.टी स्टॅन्ड लगतच फकीरभाईंचे पेढ्याचं दुकान आहे. या पेढ्यांचा व्यवसाय अगदी मर्यादित असला, तरी या पेढ्यांची ख्याती मुंबंई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पसरली आहे. अस्सल खवा, साखर, वेलची इतकं साधं कॉबिनेशन असलेले पेढे हे स्थानिकांच्या पसंतीला उतरले आहेत.

फकीरभाईंचा एक पेढा हा 40 ग्रँमचा आहे. पेढ्याची गोडी तशी मध्यम आहे. पेढ्याला हलकासा वेलचीचा स्वाद आहे. हीच या पेढ्याची खासियत आहे. हा पेढा डायबेटिस पेशंट ही खाऊ शकतात. (आपल्या प्रकृतीप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

फकीरभाईंच्या पेढ्यांची 45 वर्षांची परंपरा
फकीरभाई पापाभाई तांबोळी मागील ४५ वर्षापासून या पेढ्यांची टेस्ट टिकवून आहेत. फकीरभाई रोज सुमारे सव्वाशे लीटर ताजं म्हशीचं दूध आटवतात, हा खवा आणि त्यापासून पेढे हा च्यांचा नित्याचा दिनक्रम ठरलेला.

हा खवा चांगला भाजून घेतला जातो, त्यानंतर साखरेच्या पाकात मिश्रण बनवलं जातं. तासभर हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवल्यानंतर त्याचं मिश्रण बनवलं जातं.  फकीरभाई सुरूवातीला फेरीवाल्यासारखे पेढे विकायचे, आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे.

ओतूर गावच्या आठवडी बाजारात तसेच श्रावण महिन्यातील ओतूरच्या जत्रेत, सुट्ट्यांच्या काळात या पेढ्याला अधिक मागणी असते. शहराकडे गावाकडून काय आणलं असं विचारणाऱ्या मित्र-आप्तेष्टांसाठी गावकरी, पाहुणे मंडळी चार-चार किलो पेढे पुण्या-मुंबईला नेतात.

फकीरभाईंच्या पेढ्यांचा खप
फकीरभाईंच्या पेढ्यांचा दरदिवशी 30 ते 40 किलोचा खप होता. व्यवसाय वाढीसाठी फकीरभाईंना मोठ्या शहरांमधून ऑफर येतात, पण गुणवत्ता टिकवण्यासाठी फकीरभाई नकार देतात आणि आपल्या या छोट्याशा ‘गोड’ जगात समाधान मानतात.

फकीरभाईंच्या 1 किलो पेढ्यांची किंमत आहे 240 रूपये (2013 या वर्षातील भाव)

फकीरभाईंचा एक पेढा 40 ग्रँमचा असतो, तुम्हाला 20 ग्रँमचा पेढा हवा असेल तर तो ऑर्डर करून मिळू शकतो. गरीब शेतकरी घरी आठवडी बाजारातून घरी परतत असतांना दोन-दोन पेढे नेतात, चाळीस ग्रॅमचा हा पेढा 10 रूपयांना मिळतो.

रामनाथ मिसळ

स्वप्नाली अभंग, पुणे

पुणे हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं हे तर निर्विवाद सत्य आहे. पण त्यातही पूणेरी मिसळ आणि खवय्ये याचं अतूट नातं आहे. या पुणेरी मिसळीचा ऎक वेगळाच चाहता वर्ग आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मिसळी मिळतात पण टिळक रस्त्यावरच्या रामनाथ मिसळीची बात काही औरच.

पन्नास वर्षांची परंपरा

ramnath misalपुण्यातली ही सर्वात जुनी आणि प्रसिध्द मिसळ. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेलं हे दुकान होतं रामनाथ कुमंठेकरांचं पण ४० वर्षां पुर्वी ते विकत घेतलं शांतीलाल खन्ना यांनी. शांतीलाल खन्ना यांनी रामनाथ या नावाबरोबरच मिसळीची गुणवत्ता आणि चव या दोन्ही गोष्टी कायम टिकवून ठेवल्या.

रामनाथ मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे झणझणीतपणा. तिखटासाठी प्रसिध्द असलेल्या या मिसळीने केवळ पुण्यातल्याच नव्हे तर दिल्ली, मुबंई, केरळ आणि त्याचबरोबर परदेशातल्या खवय्यांनाही आकर्षित केलं आहे.

खवय्यांची गर्दी

तळलेले कांदा पोहे त्यावर शेव चिवडा, वाटाण्याचा रस्सा आणि त्यावर कांदा, लिंबू, काय सुटलं ना तोंडाला पाणी? इथं पण ही मिसळ नुसतं तोंडालाच नाही तर नाका डोळ्यांना ही पाणी आणते तेव्हा जरा जपून. रस्सा वाटीत येतो. कमी तिखट, मिडीयम आणि तर्रीबाज तिखट असे तीन रस्सयाचे प्रकार तुम्ही आवडी नुसार निवडू शकता. तर अशी ही मिसळ चापण्यासाठी खवय्यांची रांग लागणं नवीन नाही.

 सेलिब्रिटीजची मांदियाळी

केवळ रामनाथची मिसळ खाण्यासाठी मुद्दाम पुण्यात येणारे अनेक जण आहेत. काहीजण इथली मिसळ पार्सल करून परदेशात ही नेतात. अनेक कलाकार मंडळी ही मिसळीची फॅन आहेत. दादा कोंडके, निळू फुले ते अजय-अतुल पर्यंत अनेक कलाकारांनी या मिसळीचा आस्वाद घेतला आहे. फक्त ३०० स्कवेअर फूटांच्या जागेत असणारं या दुकानातल्या पदार्थांची किर्ती मात्र अफाट आहे.

या वास्तूत जादू

या वास्तूत जादू आहे, त्यामूळे इथला पदार्थ हमखास चांगला होतोच असं रामनाथ मिसळचे रणजित खन्ना म्हणतात. विषेश म्हणजे इथं ४० वर्षां पुर्वीचे आचारी अजून टिकून आहेत. परंतू या मिसळी साठी रांगा लावणारे खवय्ये हेच या मिसळीचे खरे चाहते आहेत.

हे खवय्ये नुसती मिसळ खात नाही, तर तर त्याबरोबर रस्सा ही पितात. मिसळी बरोबरच जर गोल भजी आणि बटाटे वडा याचां उल्लेख केला नाही तर या दोन्ही पदर्थांवर तो अन्याय ठरेल.

गरम गरम टपोरे गॊला भजी आणि मोठ्या आकाराचा बटाटे वडा यांचा तर मोह आवरणं अशक्य. बटाटा वड्यायाच्या आतली भाजी तर अगदीच वेगळी बच्चे कंपनीला हमखास पंसत पडणारी. जर कधी रामनाथ च्या बाहेर रांग लावण्याचा योग आला तर इथली मेन्यू पाटी नक्की तुमचं मनोरंजन करेल.

पाककला निपुण गृहिणीही जेव्हा आपल्या हाताच्या चवीला कंटाळतात, तेव्हा सहकूटंब रामनाथकडे वळतात ’ हे पाटीवरचे मजेशीर वाक्यं तसेच अफालातून मेन्यू खाण्यात रंगत आणतात.

 मेन्य़ू

सुपर, हूप्पर बटाटॆ वडा

तबकडी बजी (बटाटा भजी)

खेकडा भजी ( कांदा भजी)

हमदर्द दहिवडा

जवा मर्द कोल्हापुरी मिसळ

मिसळची ऎका प्लेट चा दर आहे ४० रुपये (2013)

गोल भजी २० रुपये प्लेट तर एका बटाटे वड्याची किंमत आहे १० रुपये.