पुण्यातलं खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे एकदम कडक कर्वे रस्त्यावरची काटाकिरर मिसळ.
तासाभरचं वेटिंग झालं तरी चालेल पण मिसळ चापल्या शिवाय मागे फिरायचं नाही असं इथं येणारे मिसळ प्रेमी म्हणतात. कडक कोल्हापूरी तर्रींचा रस्सा, फरसाण, त्यावर कांदा आणि लिंबू जोडीला दह्याची वाटी आणि मठठा सूध्दा.
कडक रस्स्याने तोंड भाजलं तर दही आणि मठठा आहेच त्यामूळे ज्यांना तिखट सोसवत नाही त्यांच तिखट मिसळीचं मिशन ही सहज साध्य होतं.
मिसळीचा रंजक प्रवास
या काटाकिरर मिसळीचा प्रवास ही मोठा रंजकच आहे. अवघ्या पाच वर्षांपुर्वी सुरू झालेली काटाकिरर आज पुण्यातली सर्वात प्रसिध्द मिसळ झाली आहे. काटाकिरर चे प्रसाद आवटी हे मूळचे सांगलीचे.
आवटी यांनी बीएसी आणि एमबीए चे शिक्षण घेतलेले पण नोकरी करणं त्यांना पटलं नाही. मग त्यांनी अवघ्या हजार रुपायांच्या भांडवलावर गरवारे कॉलेज समोर मिसळीची छोटेखानी दुकान सूरू केलं. अल्पावधीतच इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा या मिसळीला चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळी सातपासून रांग
पण काही अडचणींमुळे जोरात चाललेलं हे मिसळ हाऊस आवटी यांना बंद करावं लागलं. पण लवकरच नव्या जागेत आवटी यांनी आपलं मिसळ हाऊस चालू केलं. या नव्या जागेचा माग काढत खव्य्यांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच रांगा लावायला सूरू केली. कूठचीही जहिरात न करता केवळ माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर अनेक मिसळ प्रेमी या मिसळशी जोडले गेले.
कमालीची स्वछता आणि गुणवत्ता
कमालीची स्वछता आणि गुणवत्ता असा नावलौकिक असलेल्या या मिसळ हाऊस चा दिनक्रम सुरू होतो तो पहाटे ३ वाजता. आवटी स्वत: मिसळी साठी लागणाऱ्या ओल्या मसाल्याची फोडणी करतात.
मिसळीसाठी लागणारे गोडे मसाले त्यांच्या पत्नी घरी तयार करतात. गेल्या पाच वर्षांत मिसळ उरली असं कधीच झालं नाही. मिसळवर उपवास सोडणारे अनेक जण इथं पाहायला मिळतील.
गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे
इतकचं नाही तर गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे लागतात. आणि हे डोहाळे पूर्ण करण्यासाठी अगदी नवव्या महिन्यात ही महिला आपल्या पतीसोबत येतात. काटाकिरर ची वाढती मागणी लक्षात घेऊन आवटी यांनी जयसिंगपूरला शाखा सुरू केली. लवकरच अन्य ठीकाणीही शाखा सूरू करण्याचा त्यांचा मानस आहे.