कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू
राजाभाऊंचा मुलगा रवींद्र बापू

सचिन पाटील, कोल्हापूर | कोल्हापूर म्हटलं की खवय्यांना पहिल्यांदा आठवतो, तो म्हणजे झणझणीत तांबडा आणि पांढरा रस्सा, फडतारेंची चमचमीत मिसळ आणि आपल्या राजाभाऊंची नाद खुळा भेळ….

ताबंडा- पांढरा रस्स्याचा स्वाद चाखायचा आहेच, (म्हणजे इथं तो फक्त वाचता येईल), पण त्याआधी आपण राजाभाऊंच्या भेळबद्दल बोलू.

कोल्हापुरात या आणि कुणालाही विचारा,  “भावा राजाभाऊची भेळ कुठं रे”? मग लगेचच तुम्हाला ढगाएवढे हात करून, त्या दिशेकडे हात दाखवून आणि भावाच्या सादेला त्याच प्रेमाने साद देत, पत्ता सांगितला जाईल.

तर राजाभाऊची भेळ पूर्वी भवानी मंडपात सुरू झाली होती. आता ती केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाजवळ आहे. जागा बदलली असली, तरी चव तीच आहे. बऱ्यापैकी मोठा गाडा, पांढरे शुभ्र कपडे घातलेले कर्मचारी आणि गाड्याभोवती जमलेली गर्दी, असा राजाभाऊ भेळचा लवाजमा.

राजाभाऊंच्या भेळबद्दल प्रत्यक्ष मी पामराने काय सांगावं?  जावं आणि खाऊन यावं, एवढं साधं वर्णन करता येईल.

तिथे गेल्या गेल्या चुरूचुरू कांदा चिरणारे कर्मचारी, आणि गर्दीला त्याच कौशल्याने हाताळणारे रविंद्र बापू दिसतील. रविंद्र बापू हे राजाभाऊंचे चिरंजीव. त्या गर्दीतूनच, दादा, ताई या, कोणती भेळ देऊ, किती (क्वॉन्टीटी) हवी, वगैरे हे आपुलकीने विचारणं आलंच.

पण जास्त लक्ष वेधून घेतं, ते वाऱ्यावर उडणाऱ्या गवताच्या पात्याप्रमाणे, चलाखीने हलणारे त्यांचे हात. इतक्या वेगाने हलणारे हात, इतकी रुचकर, स्वादिष्ट भेळ कशी काय बनवू शकतात?, हा सुद्धा एक प्रश्नच उद्भवतो.

भेळीचा एक घास तोंडात घातल्यानंतर, तो कधी खाल्ला जाईल, आणि दुसरा घास कधी घेऊ, याची गडबड मनात झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी.

प्रत्येक ठिकाणच्या भेळीचं असं वैशिष्ट्य असतंच, तसं या भेळीचंही आहेच. पण हे ज्याने-त्याने खावं आणि आपापलं असं वैशिष्ट्य ठरवून टाकावं….

या मग एकदा कोल्हापूरला आणि राजाभाऊंची भेळ खाऊन पाहाच…

One thought on “कोल्हापूरच्या राजाभाऊंची भेळ

Leave a Reply