स्वप्नाली अभंग, पुणे | पुण्याच्या मिसळ कट्ट्यातली आणखी एक मानाची मिसळ म्हणजे हेरंबची मिसळ. पुणेरी मिसळींना तोड नाही हेच खरं, मिसळी मधली इतकी व्हरायटी कुठच्याही शहरात सापडणार नाही. लक्ष्मी रोड, तुळशी बाग इथली मनसोक्त खरेदी करून झाल्यावर पोटातले कावळे ओरडायला लागल्यावर पुणेकर वळतात ते हेरंब हॉटेल मधल्या मिसळीकडे.
पत्ता – हेरंब मिसळ, शुक्रवार पेठ, शेवडे गल्ली
वेळ सकाळी ९ दुपारी ३ वाजेपर्यंत
रविवारी हॉटेल बंद
शुक्रवार पेठ शेवडे गल्लीतलं हे मिसळ आणि बटाटेवडासाठी प्रसिध्द असणारं हॉटेल आज अनेकांच्या तोंडावर आहे. मटकी, बटाटयाची भाजी, पोहे, शेव चिवडा, खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो कांदा आणि तर्रीचा लाल रस्सा पाहुन तोंडाला पाणी सुटतं. थोडीशी आबंट गोड असणाऱ्या या मिसळीचा झटका ही न्यारा.
मिसळीसाठी लागणारा मसाला चांगला परतला जातो, अगदी दुकानात बसलेल्या ग्राहकांच्या पोटातला अग्नी या खमंग मसाल्याच्या वासाने अधिकच भडकतो. इथं मिसळी बरोबर स्लाईस ब्रेड दिला जातो. आणि विशेष म्हणजे एक्स्ट्रा कांद्यासाठी एक्स्ट्रा पैसे ही पडत नाही.
चार वर्षापूर्वी विठ्ठल लक्ष्मण रानडेंनी सुरूवात केली
पुणेकर एक्स्ट्राचा कांदा फुकट मिळाला की जाम खूश होतात. अवघ्या चार वर्षांपूर्वी विठठल लक्ष्मण रानडे यांनी सुरू केलेल्या या हॉटेल ला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय.
मिसळी बरोबरच इथला बटाटेवडा, कांदा पोहे, उप्पीट, कांदा भजी, पाव सॅम्पल हे पदार्थ ही लोकप्रिय आहे. इथलं विशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक पदार्थांवर कांदा, आणि ओलं खोबरं घातलं जातं अगदी बटाटे वड्यावर ही.
इथल्या पदार्थांवर ताव मारून झाला की, बिल देताना विठ्ठल काका ग्राहकांच्या हातात एक कागद देतात त्यात असतात रूटिनला सामोर जाण्यासाठी काही उत्साहवर्धक टिप्स.
इथं मोठ्या ऑर्डरनुसार मिसळ पार्सल ही दिली जाते. सकाळी ९ ला सुरू होणार दुकान दुपारी ३ वाजेपर्यंत उघडं असतं. रविवारी मात्र हे हॉटेल बंद असतं.
आम्हाला तुमच्या हॉटेलची माहिती मेल करा [email protected]