मालवण समुद्र

non-veg - Copyअजित वायकर

डिलाईल रोडची ओळख आहे ती मिनी कोल्हापूर म्हणून. सुमारे ५० हजार कोल्हापूरकर इथं संसार थाटून असावेत.  पण, इथल्या हॉटेलांतली खाद्यसंस्कृती मात्र अस्सल कोकणी आहे. या हॉटेलांच्या मेनूतून कोल्हापुरी सामिष हद्दपार असलं तरी हा अनुशेष कोकणाने भरून काढला आहे.

ताटात येणारं हे अरबी समुद्रातलं ‘लजीज’ चवींचं जैववैभव दर्दी खवय्यांची दाद घेऊन गेलं नाही, असं होणार नाही. पापलेट-सुरमईपासून मांदेली-कर्लीपर्यंत नाव घ्याल त्या माशांचा सुकाळ आहे. तिस-याची कोशिंबीर आहे नि मसाल्यात घोटून केलेलं सुकटाचं लोणचंदेखील आहे.

हॉटेलांची नावंसुद्धा कोकणातल्या गावांचा अभिमान मिरवणारी. त्यात गर्दी खेचणारं आघाडीवरचं नाव म्हणजे मालवण समुद्र!! या परिसरात सी-फूडवाली हॉटेलं खंडीभर आहेत. पण, मालवण समुद्रची सर त्यातल्या फारच कमी हॉटेलांना आहे.fish dish

इथले दरदेखील खिशाला रडवणारे नाहीत. प्रत्येक पदार्थाची किंमत एकदम माफक. मालवणी तिखटात घोळून सजवलेलं ताजं फडफडीत पापलेट शंभराच्या नोटेला तुमच्या समोर हजर होतं.
अगदी स्वस्तात पोट भरून तिस-याची (शिंपल्याची)  कोशिंबीर किंवा भाजी खाण्याची चैनदेखील याच ठिकाणी परवडू शकते.

कारण, इतर हॉटेलांत शंभराच्या किमान तीन नोटा काढल्याशिवाय तिस-याचा ‘ति’सुद्धा नजरेला पडत नाही. जर कुणाला ‘मालवण समुद्र’ऐवजी दुसरीकडे कमी किंमतीत तिस-या चाखायला मिळालाच, तर आपल्या भाग्याचे कोडकौतुक करण्याऐवजी नंतर तो नशिबाला शिव्या घालत ताटावरून उठण्याची शक्यताच जास्त.

कारण, अशा तिस-यांच्या कवचाआड खाण्याचा ऐवज सापडण्याची शक्यता जवळपास ‘नाही’च्या घरात असते. शिवाय, तिस-याला चिकटलेली समुद्राची बारीक रेती जाऊन तोंडात जाऊन आनंदाचा विचका भिती आहेच.

तसंही तिस-या खाताना दातांना जरा जास्तच कष्ट पडतात. मग उगीच कमी किंमतीच्या तिस-याच्या मोहात कशाला पडायचं ? आपल्याला पोटाला खूष करायचं असतं, जीभ तृप्त करायची असते.

दातांना व्यायाम घडवायचा नसतो आणि हिरड्यांना दुखापतही करून घ्यायची नसते. त्यामुळे बजेट कमी आणि तिस-या खाण्याची इच्छा असेल, तर डिलाईल रोड- लोअर परळ परिसरात ‘मालवण समुद्र’शिवाय दुसरा चांगला पत्ता नाही.

रावस-पापलेटसारख्या राजेशाही माशांच्या तुलनेत मांदेली-सुकटाचा रुबाब कमी असतो. त्यामुळे ब-याच हॉटेलांच्या मेनूतून ही जोडगोळी गायब असते.

पण, ज्याच्या जिभेला या हॉटेलातल्या मांदेली फ्रायचा स्पर्श झालाय, तो आयुष्यात मांदेलीला कमी लेखण्याचा मूर्खपणा परत कधी करणार नाही. मासे चवदार तर असतातच. पण, चटकदारसुद्धा असतात हे कळतं ती ‘मालवण समुद्र’मध्ये बनणारी मांदेली खाल्ल्यानंतर !
या हॉटेलातल्या मसाल्यात ओल्या नारळाचा भरपूर वापर होतो.

वाटीचे काठ पकडून ठेवील, इतका घट्ट ग्रेव्हीवाला रस्सा इथं ओरपायला मिळतो. बाकीच्या हॉटेलांप्रमाणे रस्सा म्हणून तिखटजाळ पाणी वाढण्याचा प्रकार इथं होत नाही.
तुम्ही मासे घ्या किंवा चिकन-मटन.. इथल्या तांबूस-सोनेरी चमक असलेल्या वड्यांना आणि नीर डोश्यासारख्या लुसलुशीत तांदळाच्या भाकरीला न्याय द्यावाच लागतो.

हा परिसर जुनाट बीडीडी चाळींचा. कनिष्ठ मध्यमवर्गीय कामकरी मंडळींचा. मुंबईत पैशाचा महापूर वाहतो, डिलाईल रोडवर येऊन तो ओसरतो. आर्थिक सुबत्तेचा अथवा अभावाचा परिणाम त्या-त्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीवरसुद्धा दिसून येतो.

भले डिलाईल रोडवरच्या या ‘मालवण समुद्र’मध्ये लोअर परळच्या उंची हॉटेलांचा झगमगाट नसेल, पण चवीच्या बाबतीत हे हॉटेल त्यांच्या इतकंच सरस आहे.

त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर कुठलाही असो. एखादा वधूपिता आपल्या मुलीच्या आयुष्याचे कल्याण व्हावे, यासाठी जसा जिवाचा आटापिटा करून सुयोग्य वर धुंडाळतोच, तसे दर्दी मासेखाऊ शहराच्या कानाकोप-यात कुठेही असले, तरी जेवणासाठी ‘मालवण समुद्र’च्या किना-यावर गर्दी करतातच.

4 thoughts on “मालवण समुद्र

  1. डिलाई रोडच्या मालवणी, समुद्र किनारा, ( नाम जोशी मार्गावर , लोअर परळ ते पोलिस चौकिच्या मार्गावर ) मी गेलेलो आहे. पण जेवणात इतके जास्त मसाले होते, की मुळ माशांची चव संपली होती.
    हेच कारण आहे की, मला गोवनीज, किंवा पोर्तूगिझ स्टाइलचे मासे जास्त आवडतात. का कोण जाणे, पण हा मालवणी प्रकार कधी फारसा आवडला नाही.

  2. महेंद्र आम्ही लवकरच तुमच्यासाठी गोवियन फूडची हॉटेलची माहिती घेऊन येतोय. निश्चितच आम्हाला तुमच्या चवीचा मान राखावा लागेल.
    खूप सारे धन्यवाद

  3. ग्रेट. मुंबईचे फ्रेश कॅच माहिमचे माझे आवडते. तसेच बांद्र्याचे गोमंतक पण चांगले आहे, पण क्वॉंटीटी कमी आणि रेट्स फारच जास्त आहेत. पण इथले बॉंबे डक फ्राय मस्त असतात.

    दिवा पोर्तूगिझा ओव्हर प्राइस्ड पण चांगले रेस्टॉरंट आहे . ते पण मला आवडते

    .रेषाद मसाला किंग फिश कुठे मिळतो मुंबईला माहिती आहे का? असेल तर नक्की सांगा.
    मंगलोरी स्टाइल साठी आपले महेश आहेच, अजूनही काही जागा असतील तर नक्की सांगा. .

    गोव्याला मी नेहेमीच जात असतो. दर महिन्यात एकदा तरी चक्कर असतेच, गोव्याच्या बेस्ट हॉटेल्स ची माहिती माझ्या ब्लॉग वर आहेत, (खाद्ययात्रा या भागा मधे) थाबवतो इथेच, नाही तर एक पोस्ट होईल इथेच तयार 🙂 धन्यवाद.

  4. दादरच्या सायबीण मधे एकदा गेलो होतो. मासे शिळे होते 🙁 नंतर पुन्हा हिम्मत झाली नाही तिकडे जायची. फ्रेश कॅच का पर्याय नाही 🙂

Leave a Reply