दादरमधील ‘जिप्सी कॉर्नर’

मुंबई : दादरला शिवसेना भवनाच्या चौकात ‘जिप्सी कॉर्नर’ नावाचं हॉटेल आहे, या हॉटेलात तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी चाखण्यास मिळते. फास्टफूड देखील येथे मिळते.

gypsy_cornor_dadar
जिप्सी कॉर्नर, दादर

मराठी पदार्थांची सतत रेलचेल येथे असते, अगदी पिठलं भाकर, ते शेव टोमॅटो भाजीपर्यंतचे सर्व पदार्थ तुम्हाला या हॉटेलात खायला मिळणार आहेत.

एकंदरीत या हॉटेलात वातावरणंही तसं चांगलंच आहे, हॉटेलसमोरही बसण्यास भरपूर जागा त्या मानाने आहे. इथल्या पदार्थांची चवंही चांगली आहे.

जिप्सी कॉर्नर हे दादरमधील खाण्याच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हटलं जातं, अनेक मराठी सेलिब्रिटीजचं येथे येणं जाणंही असतं.

हा हॉटेलात मिळणारे पदार्थ
मेतकूट, गावरान झुणका, पिठलं भाकरी, शेव टोमॅटोची भाजी, दही भात, ज्वारीची भाकरी, साबुदाणा खिचडी, मिसळ पाव, फालुदा, कोशिंबीर वडी, मसाला काकडी, भरलेली वांगी, मसाले भात, मसाला काकडी, भेंडी भाकरी, मटरवडा, मँगो मिल्कशेक, थालीपिठ, दहीपुरी, चीझ नॅचोज, चीझ गार्लिक ब्रेड, गाजर हलवा, साबुदाणा वडा.

पत्ता
जिप्सी कॉर्नर
दादर शिवाजी पार्क
शिवसेना भवनाच्या विरूद्ध बाजूला,
केळुस्कर रोड, दादर शिवाजी पार्क, दादर

प्रकाशचा साबुदाणा वडा

साबुदाणा वडा
दादरच्या प्रकाश हॉटेलचा प्रसिद्ध साबुदाणा वडा

प्राजक्ता धर्माधिकारी-कुंटे, मुंबई | दादर… मुंबईतलं प्राईम लोकेशन…. मुंबईत राहणारा प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या निमित्ताने दादरमध्ये येतच असतो.

दादरमध्ये खरेदी, फिरणं, खाणं, पिणं सगळंच चालतं. त्यातीलंच खाण्याची काही मोजकी मराठमोळी ठिकाणं आजही जोमात सुरू आहेत. त्यामध्ये प्रकाशचं नाव आलं नाही तरचं नवल.

मराठी माणूस तसा फार चोखंदळ पटकन कोणत्याही गोष्टीला सर्टिफिकेट देणार नाही, पण अनेक वर्षाची परंपरा जपत आणि तीच चव टिकवत प्रकाशने आपलं स्थान लोकांच्या मनात आणि जिभेवर कायम राखलं आहे.

प्रकाशचा साबुदाणा वडा हा मराठी असो, वा अमराठी लोकांसाठीही जिभेवरची चव आहे.  तिथे तुम्ही कधीही जा वेटिंग असणारंच. साबुदाणा वडा आणि त्या सोबत असणारी दाण्याची चटणी, ही चव मी या आधीही कधी घेतली नव्हती, आणि ही चव दुसरीकडे कुठेही मिळणार नाही याची खात्री आहे.

साबुदाणा वडा अनेक ठिकाणी मिळतो, पण त्याला चव प्रकाशच्या वड्याला नाही. उपवासाच्या दिवशीतर घरात वेगवेगळे पदार्थ करण्यापेक्षा प्रकाशमधून, पार्सल घेऊन येण्याला किंवा तिथेच जाऊन खाण्याला अनेक जण प्राधान्य देतात.

आषाढी एकादशी, महाशिवरात्री या उपवासाच्या दिवशीतर चक्क प्रकाशमध्ये पाटी लिहिलेली असते, उपवासाच्या पदार्थांशिवाय काहीही मिळणार नाही. मग काय ही मोठी रांग लागते खवय्यांची. साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, बटाटा पुरी, भगर, आणि स्विट डिश म्हणून थंडगार पियुष.

प्रकाशचा बटाटा वडा ही इतरांपेक्षा वेगळी टेस्ट असलेला. गरमा गरम आणि चविष्ट. आळुवडी, कोथिंबीरवडी, मिसळ… असे अगदी मराठमोळे पदार्थ असूनही प्रकाशचा बिझनेस फुल्ल चालतो.

परदेशात असलेले दादरकरही घरी आल्यावर प्रकाशला आवर्जुन भेट देतात. हेच तर प्रकाशचं यश आहे. म्हणतातना कोणाच्याही मनात जाण्याचा मार्ग पोटातून जातो. तसं प्रकाशने त्यांच्या ग्राहकांच्या मनात अढळ असं स्थान निर्माण केलं आहे.

अनेकांचं म्हणण असतं मराठी माणसं बिझनेसमध्ये कच्ची असतात त्यांना तो जमत नाही पण प्रकाश याला अपवाद आहे. प्रकाशचं स्थान कायमच अढळ राहील.