पौष्टीक इडलीचं उदय विहार

vegस्वप्नाली अभंग | पुण्यात माणूस उपाशी राहू शकत नाही. कोपऱ्या कोपऱ्यावर चौका चौकात हमखास खाण्याचे पदार्थ मिळतात. स्वस्त आणि मस्त असे अप्रतिम चवीचे पदार्थ मिळण्याची अनेक ठिकाणं पुण्यात भरपूर सापडतात. असचं एक न्याहरीचं ठिकाण म्हणजे ’उदय विहार’

uday vihar pune“बाई एक प्लेट इडली द्या’ काऊन्टरवरून आवाज आली की अगदी पाच मिनिटातच, आतून एका छोट्याशा खिडकीतून लाकडी ट्रेवर ऑर्डर दिलेला पदार्थ येतो.

टिळक रोडवरच्या एस.पी कॉलेजच्या समोरच असणाऱ्या उदय विहार या छोटेखानी ‘स्नॅक सेंटर’मध्ये जादुई वाटावं, असं हे नेहमी दिसणारं चित्र. इडली बरोबरच खिचडी, मिसळ, पोहे, उपमा, एस.पी.डी.पी या पदार्थांवर सगळेच तूटुन पडतात.

पौष्टिक नाश्ता
पौष्टिक इडल्या इथली खासियत. टपोऱ्या इडल्या मध्येच मटार, गाजर, फ्लॉवर आणि थोडासा मसाला असं मस्तं पौष्टिक कॉम्बीनेशन इथं चाखायला मिळतं. या इडल्या बरोबर ओला नारळ आणि डाळं असलेली चटणी मिळते.

थोड्याशा पिवळसर असणाऱ्या या इडल्यांमध्ये वाफवतानाच या भाज्या घातल्या जातात. या इडल्यांची चव ही अगदी अप्रतिम आहे. इडली बरोबरच ‘उदय’च्या पोहे, उपमा, बटाटे वडा, खिचडी आणि मिसळ हे पदार्थ एकदम फर्स्ट क्लास असतात.

कांदा पोहे त्यावर ओला नारळ आणि शेव या पोह्यांच्या एका प्लेटमध्ये कदाचित पोट भरतं. इथलं उपीट तर अप्रतिम. बारीक रव्याचं थोडसं पातळसर आणि त्यावर शेव, हे डिश खाल्यानंतर झकास हा शब्द आपसूकच ओठांवर येणार. इथल्या खाद्यपदार्थांवर ताव मारल्यानंतर कोकम सरबत, पन्हं, ताक ही मराठमोळी पेयं ही उपलब्ध आहेत.

साठ वर्षांचे साक्षीदार
उदय विहार १९५४ साली सुरू झालं, आणि आजही आपली खासियत टिकवून आहे. केवळ १०० स्क्वेअर फूटांच्या जागेत असलेल्या या हॉटेलच्या पदार्थांची जादू काही औरच आहे.

या स्नॅक सेंटरचे मालक उदय लवाटे वयाच्या साठीतही आलेल्या गिऱ्हाकांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करतात. या स्नॅक सेंटरच्या समोरच एस.पी कॉलेज आहे. त्यामुळे एस.पीच्या विद्यार्थी आणि स्टाफचा हा फेवरेट खाद्य कट्टा.

विद्यार्थी कॉलेजचे माजी विद्यार्थी झाले, तरी आपल्या या कट्ट्याला मात्र विसरत नाहीत. इडली, पोहे, आणि उपमा यांची चव घेण्यासाठी मुद्दाम वाट वाकडी करून ते उदय काकांकडे येतात.

हे सारे अप्रतिम चवीचे पदार्थं बनवण्याचं श्रेय जातं, ते उदय काकांच्या पत्नी रिमा लवाटे यांना. यामुळे चवीत आजतागायत बदल झालेला नाही.

पुण्यात आल्यानंतर खास ‘उदय विहार’मध्ये नाष्टा करायला येणारे अनेक जण आहेत. अगदी सकाळी ८.३० सुरू होणारं हे स्नॅक सेंटर रात्री ९ पर्यंत चालू राहतं. शिवाय इथल्या पदार्थांचे रेट हे ३० रुपयांच्या आत आहे.

One thought on “पौष्टीक इडलीचं उदय विहार

Leave a Reply