मुंबईत महालक्ष्मीच्या धोबी तलावापासून दोन मिनिटांच्या अंतरावर, सातरस्ता चौकातून आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे. तुम्ही पहिल्यांदा या हॉटेलात जात असाल तर तुम्हाला विचारावं लागेल, की श्रीराम हॉटेल कुठे आहे.
कारण श्रीराम हॉटेल हे बाहेरून खूप लहानसं दिसतं, श्रीराम दुग्धालय लिहलेला या बोर्ड तसा नजरेला पडत नाही. मात्र तीन फूट रूंद आणि पाच फूंट लांब अशा छोट्याशा बोळीत प्रवेश केल्यावर, तुम्हाला भलं मोठं श्रीराम हॉटेल दिसून येईल. इथं एवढं मोठं हॉटेल आहे, हे बाहेरून कुणीही म्हणणार नाही. एका गुहेत आल्यासारखा तुम्हाला वाटेल.
सकाळची वेळ श्रीराम हॉटेलमध्ये तुम्ही सकाळी 10 वाजेच्या आधी गेले, तर शेव आणि खोबऱ्याचा किस असलेलं अस्सल चवदार कांदा-पोहे तुम्हाला खायला मिळेल.
यासोबत जर तुम्ही चहा घेतला तर तो चहा तुम्हाला सदैव लक्षात राहणारा असेल. आणि दुध मागितलं तर ते प्लास्टिकच्या पिशवीत मिळणाऱ्या पाश्चराईज्ड दुधासारखं नाही. याची साक्ष तुम्हाला ग्लासमध्ये देण्यात आलेल्या दुधावर आलेली जाडजूड साय नक्की देईल.
सकाळच्या वेळेस आणि दुपारी तीन नंतर तुम्हाला वडापाव आणि समोसा तिखड-गोड चटणीसह मिळेल, चटणी नाही असं कधीही होणार नाही. नुसता कोरडा समोसा तुमच्या प्लेटमध्ये आला असं कधीही इथं होत नाही. सोबत तुम्हाला यातलं काही आवडत नसेल, तर मिसळ-पाव आहेच. हे झालं फक्त नाश्त्याचं…
श्रीराम हॉटेलचं जेवण जेवणात तुम्हाला फक्त तंदुरी रोटी आहे, कुल्चा आहे, चपाती नाही, असं होणार नाही, तुम्ही मागणी केली, तर तुम्हाला चपातीही मिळू शकते. भाजीत तुम्हाला पनीर कढाईपासून सर्व भाज्या मिळतील, सर्वच भाज्यांची चव इथं लक्षात राहणारी आहे. ‘तुम्हाला मक्के दी रोटी’ आणि ‘सरसोदा साग’ही इथं मिळेल.
पुलाव, व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी याही लक्षात राहणाऱ्या आहेत. एक अख्खी बिर्याणी तुम्ही कधी संपवाल हे तुम्हाला कळणारही नाही. इथला मलाई कोफ्ताही अप्रतिम आहे.
जेवणानंतर तुम्हाला काही तरी गोड खायचं असेल, तर बंगाली स्वीटसने तुमचं तोंड गोड होईल, यात रसमलाईची चव चाखण्यासारखी आहे. एवढं समाधान होऊनही या हॉटेलातील बिल दिल्यावर तुम्हाला समाधानचं वाटेल, कारण तुमचा कुणीतरी खिसा कापला की काय, असं वाटणारे दर या हॉटेलने लावलेले नाहीत.
पत्ता – श्रीराम हॉटेल महालक्ष्मी स्टेशनपासून धोबी तलावावरून खाली सातरस्त्याकडे जातांना पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. ज्या चौकातून सातरस्ते जातात, त्या चौकाला सातरस्त्या म्हणण्यात आलं आहे. त्यातील एक रस्ता आर्थररोड जेलकडे जातो, त्या रस्त्याच्या सुरूवातीलाच श्रीराम हॉटेल आहे.
सेंट्रल रेल्वेच्या लोकलवरून तुम्ही येत असाल तर भायखळ्याहून सातरस्त्याला जाणारी बस किंवा टॅक्सी पकडा, सातरस्त्यावर आल्यावर, आर्थररोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणालाही विचारा, श्रीराम हॉटेल कुठे आहे.
तुम्हाला सरदारची पावभाजी माहित आहे का? या पावभाजीची ख्याती अख्ख्या दक्षिण मुंबईत आहे. पावभाजीसाठी ‘सरदार हॉटेल’समोर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी रांग लागते.
या पावभाजीचा फॉर्म्यूला कुणासा ठाऊक, पण सरदारची पावभाजी मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या पावभाजीत तुम्हाला जास्तच जास्त, टॉमॅटो आणि भरपूर बटर एवढंच काय ते ओळखता येईल.
ज्यांना पावभाजी आवडते, त्यांनी एकदा तरी मुंबईत आल्यावर ही पावभाजी खाऊन पहायलाच हवी, निश्चितच सरदारची पावभाजी तुमच्या आठवणीतील पावभाजीपैकी एक ठरेल.
भरपूर बटर आणि प्लेटभरून पावभाजी आणि क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे सरदारची पावभाजी. ही पावभाजी दोन जणांमध्ये शेअर करूनही काहीजण खातात. यासोबत वेगळ्या प्लेटमध्ये कांदा आणि लिंबू.
पावभाजीबरोबर येणारा पाव हा खूप चांगला आणि बटर लावलेला असतो, तो चांगल्या प्रतिचा असावा असं वाटतं, कारण सारखा त्याला तोडत बसावं लागत नाही. एकदा सरदारची पावभाजीची चव घेतली, की पुन्हा ‘सरदार’ची भेट ठरलेलीच असते.
पत्ता :तुम्ही मुंबईत राहत नसले, तरी तुम्हाला मुंबईत हाजीअली कुठे आहे?, हे माहित असेल, महालक्ष्मी स्टेशन, पेडररोड, मुंबई सेन्ट्रल यापासून सरदार एक दीड किलोमीटरवर आहे. टॅक्सीवालाही तुम्हाला सरदारपर्यंत सहज नेऊन सोडणार. त्याला फक्त सांगा ताडदेवला जायचंय, सरदारची पावभाजी खायला.
166 बी एम.मालविया मार्ग, ताडदेव-तुलसीवाडी, वसंतराव नाईक चौकाजवळ, मुंबई, महाराष्ट्र – 400 034
लालबागच्या माणसाला भूक लागली आणि त्याला आनंद भवनच्या मिसळीची तलफ लागली नाही, तर समजायचं हा माणूस लालबागमध्ये नवीनच रहायला आला आहे. तलफ अशा अर्थाने की, आनंद भवनची मिसळ तर चवदार आहेच, मात्र आनंद भवनचा चहाही तलफ लावणारा आहे.
साठ वर्षांपासून जपलेली चव
आनंद भवनने 60 वर्षापासून आपल्या मिसळची चव जपली आहे. आनंद भवनची मिसळ आणि चव जरा हटके आहे. तिखट कमी खाणाऱयांना ही मिसळ जरा तिखट वाटू शकते. पण झणझणीतपणा आल्याशिवाय तिला मिसळ तरी कोण म्हणणार?
आनंद भवनच्या मिसळीची चवीचं रहस्य मिसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्स्यात दडलं आहे.
हे तुम्हाला मिसळ पाहूनच कळेल, कारण साध्या नजरेला मिसळीत वाटाणे आणि पापडी शेव शिवाय काहीच ओळखता येत नाही. आनंद मिसळने साठ वर्षापासून आपलं वैशिष्ट कायम ठेवलं आहे.
वडापावही प्रसिद्ध
आनंद भवनचा वडापावही तेवढाच चांगला आहे. वेळ नसणारे वडापाव खाऊन रस्ता धरतात. काही गुजराथी कुटूंब आनंद भवनच्या मिसळीचं पार्सल घरी नेतांना नेहमी दिसतात. आनंद भवनमध्ये नेहमीच स्वच्छतेला महत्व देण्यात आलं आहे. साधारण तीन-चार वर्षांपूर्वी आनंद भवनने आपलं रूपडं बदललंय. पण चव मात्र 60 वर्षांपूर्वी होती ती आजही कायम आहे.
पत्ता :आनंद भवन हे हॉटेल चिंचपोकळी स्टेशनच्या पूर्व बाजूला आहे. स्टेशनपासून पाच मिनिटं अंतरावर सरदार हॉटेलच्या पुढे हे हॉटेल आहे. लालबागपासून व्होल्टाजकडे जातांना हे सरदार हॉटेलच्या चौकात आनंद भवन हे हॉटेल कुणालाही विचारा…. तुम्ही मिसळीपर्यंत पोहोचलात असं समजायचं.
स्वप्नाली अभंग, पुणे
पुण्यातल्या खवय्यांची मिसळीला पहिली पसंती असते. पुण्यातल्या पुण्यातच मिसळींची भरपूर व्हारायटी मिळते. विशेष म्हणजे हे मिसळ प्रेमी हटक्या चवीला भरभरून प्रतिसाद देतात.
लाल तर्रींबाज रस्स्याच्या मिसळीनंतर आम्ही शोध लावला, तो काळ्या तिखटातील गावरान काळ्या रस्स्याचा मिसळीचा. काळया तिखटाचा रस्सा, शेवपापडी, चिवडा, कांदा, टॊमॅटो, लिंबू आणि हिरव्या मिरच्या, लुसलुसीत पाव जोडीला, तळालेला पापड आणि चॉकलेट कॉफी. आणि हे सारं पोट भरेल इतकं.
पुणे-सातारा महामार्गावर
पुणे-बंगलोर महामार्गावरील भोर तालूक्यातल्या वेळू गावातल्या साईछाया मिसळीचं. साताऱ्याकडे जाताना कात्रज घाट ओलांडला की, अवघ्या ४ कि.मी हे मिसळ हाऊस आहे.
या गावरान ठसक्याच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी पुण्यातले मिसळचे दर्दी हमखास हजेरी लावतात. तसेच पुणे-सातारा महामार्गावरचे बहूतेक प्रवासी आपली खासगी वाहनं हमखास थाबंवून मिसळीसाठी ब्रेक घेताताच. साईछायाच्या समोरच प्रसिध्द भेळ आणि मिसळीचं दुकानं आहे
या मिसळ हाऊसचे मालक मंगेश काळे हा युवक मूळचा वेळू गावचा, पण त्याच लहान पण गेलं ते जेजूरीत. मामाकडे राहत असताना त्यांनी हॉटेल व्यवसायातले बारकावे शिकून घेतले. आपल्या मूळ गावी परतल्यावर त्यांनी साईछाया मिसळ हाऊस सुरू केलं.
स्वप्न चवदार मिसळीचं
तरूण वयात मुलं डॉक्टर, इंजिनयर बनण्याची स्वप्न बघतात, त्याच वयात मंगेश नी व्यवसाय करण्याचे ठरवले तेही हॉटेलिंग ईड्स्ट्रीतच. म्हणूनच मराठ्मोळा पदार्थं निवडून नवीन चव ग्राहकांना देण्याचा प्रयत्न मंगेशने केला.
सुरवातीला अल्प प्रतिसाद मिळला पण हळू हळू दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली. आता तर अनेक जण कर्याक्रमांसाठी इथून मिसळ पार्सल नेतात.
गावरान रस्सा
या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे काळा कडक गावरान रस्सा आणि थोडीशी आंबट्सर चव.सिझन प्रमाणे मिसळीबरोबर खवय्यांनाबी काहीतरी नवीन डिश देण्याचा या मिसळ हाऊसचा प्रयत्न असतो.
आता तर साईछायाला अनेक जण बर्थ-डे आणि विकेन्ड सेलिब्रेट करायला ही येतात. तर ही गावरान ठसक्याची मिसळ एकदा तर ट्राय करायलाच हवी.
हॉटेलचा पत्ता वेळू तालूका भोर जिल्हा पुणे पुण्याहून साताऱ्याकडे जाताना कात्रज घाटापासून ४ कि.मी अंतरावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ.
मिसळची १ प्लेट ५० रुपये विथ अनलिमेट्ड रस्सा (2013)
आपल्या आजूबाजूला खूप हॉटेल्स असतात, पण जिथे जाऊन खरचं जिभेचे चोचले भागवता येतात आणि चविष्ट जेवण जेवल्याचं समाधान मिळतं अशी खूप कमी हॉटेल्स आहेत.. मी फारशी फिरत नाही, पण मी जेवलेल्या हॉटेल्सपैकी माझ्या मनात घरं केलेलं होटेल म्हणजे सोलापूर मधलं सुगरण.. गेल्या वर्षी कामानिमित्त सोलापूरला गेले असताना या हॉटेलची आणि माझी पहिली ओळख झाली आणि तेव्हापासून मी इथल्या स्वादिष्ट जेवणाच्या प्रेमात पडलेय…
आमचे एक स्नेही आमच्या पूर्ण टीमला आग्रहानं या सुगरण मध्ये घेऊन गेले, आम्ही सगळे प्रवासानं अतिशय थकलेले असल्यामुळे कुणी फार काही प्रश्न विचारले नाहीत, सुगरण मध्ये पोहचल्यावर कळलं की ही खानावळ कम हॉटेल आहे, लाकडी बाकं-टेबलं, त्यावर ठेवलेले स्टीलचे जग आणि पाण्याचे ग्लास आणि सततची वर्दळ.. भूक खूप लागली होती, आम्ही काही ऑर्डर करण्याआधी आमच्या स्नेहींनी आमच्यासाठी खवा पोळीची ऑर्डर देऊन टाकली, हा काय प्रकार असेल याच्या विचारात असताना गरमा-गरम, खरपूस भाजलेली, तूपाची धार सोडलेली यम्मी खवा पोळी समोर आली, पहिला घास तोंडात आणि साऱ्यांचे चेहरे आनंदले, खरतरं जेवणाच्या सुरवातीलाच आम्ही डेझर्ट खात होतो पण या एका घासावरून या हॉटेलचं नाव सुगरण किती सार्थ आहे याची जाणीव झाली.. इतकी सुंदर खवापोळी मी आयुष्यात कुठेही खाल्लेली नाही…
सुगरणचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे, सुगरण मध्ये किचन पासून गल्ल्यापर्यंत सगळी कामं बायकाच पाहतात,अगदी जेवण वाढणाऱ्या मावशी सुद्धा घरातल्या पंक्तीत असलेल्या माणसाला करतात तसा प्रेमळ आग्रह.. सुगरण मध्ये थाळी सिस्टिम आहे, पोळ्या, दोन भाज्या, वरण, डाळ, भात, एखादं स्वीट, दही आणि या भल्या मोठ्या थाळीसोबत, चटणी, काकडची खमंग कोशींबीर,लोणचं, सोलापूरची खासियत असलेली शेंगा चटणी असं साग्रसंगीत सजवलेलं ताट तुमच्या समोर येतं, अशी मेजवानी समोर असताना तोंडाला पाणी सुटलं नाही तरचं नवल…
तुम्ही मोठ्या थाळीची ऑर्डर दिलीत की अनलिमिटेड जेवण, पण ताटात टाकायचं मात्र काही नाही… पण जेवणचं इतकं सुग्रास असतं की पानात काही शिल्लक ठेवण्याचा सवालच नाही..
सुगरण मध्ये काहीही खा, जेवण एकदम फर्स्ट क्लास, खवापोळी तर अप्रतिमच पण त्याचसोबत सोलापूरची खास शेंगापोळी, ऑल टाईम फेव्हरीट पुरणपोळीची चव चाखायला हरकत नाही.. सोलापूरकरांपेक्षा सुगरण मध्ये इतरांचीच गर्दी जास्त, स्टेशनच्या अगदी जवळच असल्यानं आधी सुगरण मध्ये भरपेट जेवा आणि मग ट्रेन पकडा हे तर जणू समीकरणच झालय… सोलापूरला जायचं असेल तर मला सुगरण आणि खवापोळीची कधी भेट होईल असं होत..
पण वर्षभरापूर्वीच्या सुगरणचं रूपडं आता पालटलंय, आता सुगरण बनलयं एक प्रोफेशनल हॉटेल, जिथे एसी, नॉन-एसी हॉल मध्ये बसून जेवण्याची सोय आहे, अंतर्गत सजावटपण अगदी चकचकीत, पण जुन्या रूपड्यात एक वेगळीच मजा होती… हा पण रूप बदलेलं असलं तरी चवीत मात्र नो कॉम्प्रोमाईज, जी चव वर्षभरापूर्वी तीच चव यावेळी पण चाखता आली.. खरंतर सोलापूरातल्या दूषित पाण्याच्या बातम्या एकून मी संपूर्ण सोलापूरात कुठेही पाणी पिण्याची हिंमत केली नाही पण का कोण जाणे सुगरणमध्ये टेबलावर असलेल्या जगातलं ( NO MINARAL WATER) पाणी पिताना माझ्यामनात कधीच शंका आली नाही, मी ते पाणी बिनधास्त प्यायले, कदाचित सुगरणचं घरपण आणि आपुलकी यातच दडलेली असावी.. कधी सोलापूरला गेलात तर सुगरण मध्ये अवश्य जेवा…
भेळ आपली रविवारची संध्याकाळ चटपटीत करते. मुबंईत तर चौपाटी आणि भेळ याचं अतुट नातं आहे. पण शहरी बाजाच्या भेळीं पासून जरा हटके, अस्सल रांगडी आणि चविष्ट भेळ म्हणजे ओतूरच्या दत्तूची ओली भेळ.
मुंबई नगर महामार्गावर असणाऱ्या ओतुर गावातील दत्तूची चटकदार ओली भेळ गावकऱ्यांसाठी भूषण ठरली आहे. गावात येणाऱ्या पाहुण्यांना ही ओली भेळ चाखवायला गावकरीही उत्सुक असतात. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या भेळीने भौगलिक सीमा ओलांडून आपलं वैशिष्ट्य जपलं आहे.
मुरमुरे, त्यावर दोन प्रकारचे चिवडे, थोडी पापडी, कांदा, कोथींबर. त्यावर घट्ट चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरच्यांची चटणी हे कॉबिनेशन तयार होत असतानाचा नजारा ही अनोखा. अगदी कलात्मकतेने हे मिश्रण तयार केले जाते. त्यामुळे समोर आलेल्या भेळीची चव खाणाऱ्यांच्या जीभेवर कायम रेंगाळते. विशेष म्हणजे मटकी, टोमॅटो, कैरी या कुबड्यांची या भेळीला कधी गरजच पडली नाही.
ओतुर गावात १९६० च्या सुमारास दत्तात्रय खेत्री यांनी सुरु केलेल्या, भेळीच्या गाडीचे रुपांतर आता ४ दुकानांमध्ये झाले आहे. दत्तात्रय खेत्री यांची तीन ही मुलं सुनील, राजेंद्र आणि मंगेश आज या व्यवसायात आहेत.
दिवसाला २०० ते ३०० ग्राहक या भेळीचा आस्वाद घेतात आणि इतकीच भेळ पार्सल ही नेली जाते. आठवडी बाजार यात्रा, उन्हाळा, दिवाळी आणि लग्नसराई या दिवसात तर ही तीनही दुकानं गर्दीने ओसांडून वाहात असतात.
शहरात भेळ हा संध्याकाळी खाल्ला जाणारा पदार्थ आहे, मात्र इथं दिवसभरात तुम्ही कधीही भेळीचा आस्वाद घेऊ शकता, कारण इथं येणारा प्रत्येक जण हा भेळीचा आनंद लुटण्यासाठी आलेला असतो.
मागणी प्रमाणे ही ओली भेळ पार्सल ही मिळते. पार्सलमध्ये चिंचेची आणि मिरचीची चटणी वेगळी पॅक करून दिली जाते. ओल्या भेळीबरोबर सुकी भेळ ही तितकीच चविष्ट. उत्तम प्रतिचा माल वापरल्यामुळे ही भेळ तीन आठवडे खराब होत नाही.
पुण्या, मुबंईचा चाकरमानी तसेच राज्यभरातून इथं शिकायला आलेले विद्यार्थी घरी जाताना द्त्तूची भेळ न्यायला विसरत नाही. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलं तिथं ही दत्तुची भेळ मिस करतात.
म्हणूनच मुलांच्या हटटामुळे त्यांच्या पालकांना हा भेळीचा खाऊ परदेशी कूरीयर करावा लागतो. काळाच्या ओघात या व्यवसायात बदल झाले, असले तरी या भेळीच्या चवीत आणि गुणवत्तेत काडीमात्र फरक झालेला नाही.
खानवळ म्हटलं कि, डोळ्यासमोर येते ते पाणचट आमट्या, पातळ डाळ असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं मात्र पुण्यातल्या टिळक रोडवरच्या बादशाहीचं मात्र असं नाही. चवीत आणि दर्जा याबाबतीत बादशाही ख्रोखरीच बादशाही आहे. इथ तीन तीन तास वेटिंग करणारे अनेक जण नुसता बादशाहीचा आमटी भात मिळाला तरी धन्य मानतात कारण त्यांच्या मते बादशाहीच्या नुसत्या आमटी भाताने ही पोट भरतं आणि मनं ही समाधानी होतं.
आमटी, दोन भाज्या, फुलके, भात, लोणचे, कोशिंबीर, कांदा आणि ताक असं बादशाहीच्या थाळीचं स्वरूप आहे. शिवाय पाहिजे असल्यास गोडाचे पदार्थ मिळतात ज्याच्यासाठी ज्यादा दर आकारण्यात येतो. दर दिवशी आणि प्रत्येक वेळेला इथल्या भाज्यांमध्ये प्रचंड व्हरायटी असते. आळू आणि सूरण या भाज्यांपासून ते दोडक्याचा रस्सा आणि घेवड्याची सुकी भाजी इथपर्यंत अनेक भाज्या इथं चाखायला मिळतात. अनेक भाज्यांना नाकं मुरडणारी मंडळी इथल्या भाज्यावर मात्र तुटून पडतात. याचं कारण एकच बादशाहीची अफलातून चव.
परंपरा १९६७ पासूनची
१९६७ साली सुरु झालेली बादशाही खानावळ आजच्या मेक्सिकन, इटालीयन, अमेरिकन फूड कल्चरच्या जमान्यातही आपलं वेगळे पण टिकवून आहे. बादशाही चे मालक वामन नागेश छत्रे यांनी सात्विक अन्न, स्वच्छता, शिस्तब्द्ता याद्वारे बादशाहीचा आदर्श निर्माण केला. वामन छत्रे यांच्या नंतर त्यांचे पूत्र सदानंद छत्रे यांनी ही बादशाहीच्या या थाटात कसलाही खंड पडू दिलेला नाही. इथल्या पदार्थांची चव तर इतरत्र कूठेही मिळणार नाही.
कोकणी गोडवा
सदानंद छत्रे याच सारं श्रेय देतात ते आपल्या कर्मचाऱ्यांना. इथला कर्मचारी वर्ग आहे तो कोकणातला. अगदी आचाऱ्यांपासून ते वाढप्या परर्यंत सगळेच बादशाहीच्या प्रवासात अगदी सुरवाती पासूनचे.
त्यामूळेच पदार्थ तयार करण्यापासून तो वाढ्ण्यापर्यंत च्या प्रवासातला हा कोकणी गोडवा पदार्थंची लज्जत अधिकच वाढवतो.
बादशाहीची आमटी आणि ताक
आळुची भाजी, भरलेले वागं, भरीत, सुरणाची भाजी, वालची उसळ अशा इथल्या अनेक पदार्थांवर खवय्ये फिदा आहेत. इथली आमटी आणि ताक हे तर बादशाहिचं खरं वैशिष्ट्यं. भाज्यां मध्ये ओला नारळ सढळ हस्ते वापरले जातो. रात्री उशीरा आलेली माणसं केवळ आमटी भात ही चालेल असं म्हणून पार्सल नेतात तर आमटी नसेल तर ताक भाता वरही समाधान मानणारे आहेच.
केवळ चवीतच नाही तर इतर अनेक गोष्टीमूळे बादशाहीने आपलं बादशाहीपण सिध्द केलं आहे. जुन्या लाकडी खुर्च्या, टेबल, पितळी तांबे, ताटातील डाव्या उजव्याचा शिष्टाचार, सात्विक अन्न आणि जोडीला विविध भारती वरील जुनी गाणी यामूळे इथल्या वातावरणाला जो अॅण्टिक फिल येतो तो शब्दांत मांडण ख्रोखरीच कठीण आहे.
बादशाहीत नित्यनियामाने अनेक वर्षांपासून येणारे अनेक जण आहेत. आर.व्ही बोरकर हे तर १९७४ पासून बादशाहीत येतात. त्यांना इथल्या जेवणाची इतकी सवय झाली आहे की आता घरी गेल्या नंतर त्यांना घरचं ही जेवण आवडत नाही. विश्वासराव आठवले याचं असंच काहीसं ते गेली ९ वर्ष बादशाहीचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्या मते बादशाहीची पिठलं भाकरी आणि टोमॅटोच्या साराला तर तोड नाही.
या बादशाहीची ख्यातीच अशी की, कलाकार मंडळी आणि परदेशी पर्यट्कांना पुण्यात आल्यानंतर बादशाहीत जेवणाचा मोह आवरणं कठीण. अस्सल महाराष्ट्रीयन सात्विक अन्नाचा अस्वाद घेण्याकरता अनेक अमराठी लोक इथं गर्दी करतात.
बादशाहीचा सारा कारभार हा कडक शिस्तीतच चालतो. कूपन घेण्यापुर्वी आवडीच्या भाज्या आहेत की नाही याची चौकशी करावी, पानात अन्न टाकू नये, जेवताना मोबाईल वर बोलणं टाळावं अशा आशयच्या अनेक पाट्या दिसतील. तेव्हा बादशाहीचा हा बादशाही थाट अनुभवण्यासाठी बादशाहीत येणं तर मस्ट आहे.
बादशाही थाळी ७० रुपये (2013) गोड पदार्थांसाठी ज्यादा २५ रुपये पार्सल थाळी ९० रुपये वेळ दुपारी १२ ते ३ आणि रात्री ८.३० ते १० सोमवारी बादशाही बंद असते.
(अश्विन बापट) आमच्या ‘एबीपी माझा’वरील’चॅट कॉर्नर’ या एन्टरटेन्मेंट शोसाठी अभिनेता संजय मोने यांना निमंत्रित केलं होतं. बोलता बोलता त्यांनी विचारलं, तू राहायला कुठे आहेस ? मी म्हटलं, गिरगावात. असं म्हणताक्षणी संजय मोने यांनी गिरगावातले त्यांचे दिवस सांगायला सुरुवात केली.
खास करून गिरगावातली खाद्य चळवळ यावर ते भरभरून बोलले. त्यावेळी मीही त्यांच्या त्या खमंग चर्चेच्या वेळी मनाने का होईना अवघं गिरगाव फिरून आलो.
प्रत्येक ठिकाणची वेगळी अशी खाद्यसंस्कृती असते, तशीच ती गिरगावचीही आहे.अगदी आमच्या लहानपणी प्रार्थना समाजच्या नाक्यावर असायची ती कुलकर्ण्यांकडची खमंग बटाटा भजी, प्लेट आल्या आल्या भज्जी खल्लास.
जसं हल्ली दादरच्या श्रीकृष्ण वडेवाल्याचं होतं. तिकडून पुढे आल्यावर ठाकुरद्वारला जाणारा रोड म्हणजे खाद्यप्रेमींसाठी पर्वणी. उजव्या बाजूला राजा हॉटेल, दाक्षिणात्य आणि पंजाबी पदार्थांची रेलचेल. राजाचं सांबार आणि चटणी यांची चव आजही तिच जिभेवर रेंगाळणारी. त्याच्या बाजूला पूर्वी पुरोहितचं दुकान होतं.
ज्या ठिकाणच्या खर्वसाची गोडी आजही कित्येकांच्या ओठात तरळतेय. आज तिकडे पणशीकर आहार आहे. ज्या ठिकाणचं फराळी पॅटिस खास डिमांडमध्ये.
तुम्ही उपवासाच्या कोणत्याही दिवशी या ठिकाणी जा, तुम्हाला फुटपाथ भरलेला दिसेल, पणशीकर समोरचा. अन्य खाद्यपदार्थही रुचकर. पण, पॅटिसकी बात कुछ और ही है… गरम गरम पॅटिसमध्ये पणशीकरांनी मनुका वगैरे अगदी मनापासून घातलेल्या. सोबत त्यांची अशी खास चटणी. पणशीकरचा नुसता बोर्ड बाहेरून पाहिला तरी ते प्लेटमधलं पॅटिसच त्या बोर्डमध्ये दिसायला
लागतं, इतकं ते पॅटिस मनात घर करून आहे.
याच्या अगदी समोर पूर्वी वीरकर आहार भवन होतं, ज्याच्याबद्दल संजय मोने आवर्जून बोलले, जे आमच्या पिढीने फक्त ऐकलंय.
तिथून पुढे गेलो की, निकदवरी लेनच्या नाक्यावर कोना हॉटेल होतं. मराठमोळं जेवण मस्त आणि माफक दरात मिळायचं. अगदी हल्ली हल्लीपर्यंत. आता तिकडे एक बँक झालीय. (आमचा खाण्याचा एक ऑप्शन कमी झाला.)
तोच कोनाचा फुटपाथ पकडून सरळ पुढे जायचं, तिथे कोल्हापुरी चिवडा आणि गोविंदाश्रम ही दोन हॉटेल्स अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. वेलणकरांचं कोल्हापुरी चिवडा, ज्या ठिकाणी खाद्यपदार्थांबरोबरच दिवाळी फराळाचे पदार्थही मिळतात. पुढे असलेल्या गोविंदाश्रममध्येदेखील खाद्यप्रेमींच्या उड्या पडायच्या.
त्याच लाईनमध्ये सरळ पुढे ठाकुरद्वार सिग्नलला जायचं. त्या ठिकाणी पूर्वीचं बी. तांबे उपहारगृह आणि आताचं सुजाता हॉटेल. यांच्याकडची मिनी थाळी एकदम स्पेशल. खास करून त्यांच्या आमटीची चव काहीतरी वेगळीच बुवा.
एक जानेवारीला खा किंवा ३१ डिसेंबरला तीच चव. क्या बात है…मिनी थाळी खाताना एक एक्स्ट्रा आमटी फक्त पिण्यासाठी घेणारी माझ्यासारखी अनेक मंडळी मी पाहिली आहेत. यांची डाळिंबी उसळ आणि झुणकाही एकदम फर्मास. मी या हॉटेलमध्ये खाल्लेला आणखी एक पदार्थ म्हणजे अननसाचा हलवा. केवळ अफलातून.
तिथून डावीकडे वळलं की फणसवाडीला जाणारा रस्ता लागतो. त्या ठिकाणी जुन्या मंडळींचं लाडकं, माफक दरात फक्त भोजन देणारं क्षुधा शांती भुवन. अतिशय साधं असं हे हॉटेल, आजही आपली ग्राहकसंख्या टिकवून आहे.
भाजी-पोळी, आमटी-भात, लोणचं किंवा चटणी सोबत पापड. ताक, दही. अन्न हे पूर्णब्रह्मची उक्ती सार्थ ठरवणारं खऱ्य़ा अर्थाने क्षुधा शांत करणारं हे क्षुधा शांती.
त्याच फुटपाथने सरळ पुढे गेलात की, फणसवाडी नाक्यावर मोठ्या मानाने उभं आहे ते टेंबेंचं विनय हेल्थ होम. मिसळ, बटाटेवडा हे यांचे पेटंट पदार्थ.
यांचं हॉटेल सलमानच्या पिक्चरनी जसं थिएटर हाऊसफुल्ल असतं तसं नेहमी खाऊसफुल्ल. काऊंटरवर टेंबे काका किंवा त्यांचा भाचा शैलेश देशपांडे अतिशय हसतमुखाने तुमच्याशी खास गप्पा मारणार. म्हणजे गप्पांचीही भूक मनसोक्त भागवली जाते.
इकडून सरळ गल्लीतून व्ही.पी.रोडवर बाहेर पडलात की, फडके गणपती मंदिरच्या समोर लागतं ते प्रकाश दुग्ध मंदिर. पेढे आणि अन्य पदार्थांबरोबरच यांचं पियुष केवळ लाजवाब.
हॉटेलमध्ये काहीही न खाता बाहेर उभं राहून ग्लासमागून ग्लास रिचवणारे पियुषप्रेमी त्या ग्लासमधल्या
पियुषसारखे रस्त्यावर ओसंडून वाहत असतात. यांचा साबुदाणा वडाही एकदम टेस्टी बरं का ?
गिरगाव आणि त्याच्या आसपास अशी खाण्याचे लाड करणारे असंख्य स्पॉट आहेत.पावभाजीवर तुटून पडणाऱ्यांसाठी गिरगाव चर्चसमोरचं मनोहर पावभाजी हा हॉ़ट स्पॉट. यांच्याकडे कोजागिरीसारख्या दिवशी तर ५०-५० प्लेट भाजी, २०० पाव अशा असंख्य ऑर्डर्स असतात.
शिवाय पुलाव, खडा भाजी, मसाला पावही एकदम डिमांडमध्ये. केवळ मस्का नव्हे तर यांच्याकडे साधी भाजीदेखील मिळते, म्हणूनही हे हॉटेल एकदम खास.
मनोहरच्या समोरचं जामनगरी फरसाण मार्ट, जिकडे फरसाण, जिलबी-पापडी, फराळी छोटे पॅटिस हा फेमस मेन्यू. त्याच्या बाजूलाच गेल्या काही वर्षांपासून फ्री इंडिया बेकरी झालीय. जिकडे फक्त व्हेज पदार्थ मिळतात.
केक्सपासून यांचं व्हेज पॅटिस एकदम खाण्यासारखं. पुढे चर्चच्या फुटपाथला आल्यावर समोरच फेमस भेळवाला आणि बाजूला कुल्फीवाला. मिक्स कुल्फीची लज्जत न्यारी. रात्री १० नंतर खास करून शनिवारी किंवा गणपतीच्या दिवसांमध्ये ही मंडळी फुल टू मागणीत.
त्याच्या डायगोनली अपोझिट व्हॉईस ऑफ इंडिया हा इराणी. याच्या वाफाळलेल्या चहाची चव तांबेच्या आमटीप्रमाणेच वर्षानुवर्ष तीच. बनमस्का सोबत हा चहा, त्याला साथ मित्रमंडळींची. मग काय विचारता, या इराण्याच्या हॉटेलमध्ये अनेक मोठ्या कलाकारांपासून पत्रकारांपर्यंत साऱ्यांच्या गप्पांच्या मैफली रंगल्याचं ऐकलंय. आम्हीही मारतो अधूनमधून चक्कर.
अशी अगणित ठिकाणं सांगता येतील, आजूबाजूच्या परिसरातली. स्टेशन रोडकडे जाताना दोन ज्युसवाले. ज्यांच्याकडे नेहमी तोबा गर्दी ठरलेली. त्याच्या आधी पूर्वी दरयुश बेकरी होती, जिकडचे बेकरी आयटम सॉल्लिड फेमस होते.
पुढे गेल्यावर ताराबागची भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस. हिंदुजाच्या कॉर्नरवरचा सँडविचचा स्टॉलही तितकाच त्याच्या सँडविच टेबलइतकाच माणसांनी भरलेला. तसं प्रार्थना समाजच्या बाजूला गेलात तर, राहण्याची सोय असलेल्या माधवाश्रममधलं उकडीच्या मोदकांचं जेवणही अगदी लक्षात राहणारं. त्याच्या अगदी जवळ असलेली मुमताजची टेस्टी पावभाजीची गाडी. अगदी रात्री उशीरापर्यंत ही गाडी गजबजलेली असते.
असे असंख्य खाण्याचे अड्डे अजूनही सांगू शकतो. त्यात काळानुरुप काही आयटम नव्याने अँड झालेत. ज्यामध्ये शिववडापावच्या गाड्या आहेत तसेच कोळशाच्या शेगडीवरचा खिचिया पापड, मसाला पापडही आहेच. एक पापड खाल्ला तरी पोट एकदम फुल होऊन जातं.
तर, चायनीज भेळेची टेबलंही दिसू लागलीयेत काही ठिकाणी. याशिवाय सकाळच्या वेळी लागणाऱ्या पोहे,उपमा,इडली-वडा, साबुदाणा वडा यांची असंख्य बाकडी, टेबलं याची काही गिनतीच नाही.
किती खाऊ आणि किती नको, असं होऊन जातं. तसं या खाद्यभ्रमंतीवर किती लिहू आणि किती नको, असं झालंय माझं. व्हेज खाण्याबद्दल मी भरभरुन लिहिलं. मात्र मांसाहार करणाऱ्यांसाठीही अनंताश्रम होतंच.
फक्त बिंग अ व्हेजिटेरियन तिकडे कधी जाणं झालं नाही. असो, खाता खाता तोंडाला पाणी सुटतं, मला लिहिता लिहिता सुटलंय, त्यामुळे जाऊन एखाद्या हॉटेलमधल्या डिशवर ताव मारतोच. तुम्हीही गिरगावमधल्या या खादाडीची चव चाखा एकदा तरी.
पुण्यातलं खवय्यांचं मिसळ प्रेम तर सर्वांनाच माहित आहे. वेगळ्या आणि हटके चवीला प्रतिसाद हा मिळतोच. अशीच हट्क्या चवीची आणि नावाप्रमाणे एकदम कडक कर्वे रस्त्यावरची काटाकिरर मिसळ.
तासाभरचं वेटिंग झालं तरी चालेल पण मिसळ चापल्या शिवाय मागे फिरायचं नाही असं इथं येणारे मिसळ प्रेमी म्हणतात. कडक कोल्हापूरी तर्रींचा रस्सा, फरसाण, त्यावर कांदा आणि लिंबू जोडीला दह्याची वाटी आणि मठठा सूध्दा.
कडक रस्स्याने तोंड भाजलं तर दही आणि मठठा आहेच त्यामूळे ज्यांना तिखट सोसवत नाही त्यांच तिखट मिसळीचं मिशन ही सहज साध्य होतं.
मिसळीचा रंजक प्रवास
या काटाकिरर मिसळीचा प्रवास ही मोठा रंजकच आहे. अवघ्या पाच वर्षांपुर्वी सुरू झालेली काटाकिरर आज पुण्यातली सर्वात प्रसिध्द मिसळ झाली आहे. काटाकिरर चे प्रसाद आवटी हे मूळचे सांगलीचे.
आवटी यांनी बीएसी आणि एमबीए चे शिक्षण घेतलेले पण नोकरी करणं त्यांना पटलं नाही. मग त्यांनी अवघ्या हजार रुपायांच्या भांडवलावर गरवारे कॉलेज समोर मिसळीची छोटेखानी दुकान सूरू केलं. अल्पावधीतच इथल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा या मिसळीला चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळी सातपासून रांग
पण काही अडचणींमुळे जोरात चाललेलं हे मिसळ हाऊस आवटी यांना बंद करावं लागलं. पण लवकरच नव्या जागेत आवटी यांनी आपलं मिसळ हाऊस चालू केलं. या नव्या जागेचा माग काढत खव्य्यांनी सकाळी ७ वाजल्यापासूनच रांगा लावायला सूरू केली. कूठचीही जहिरात न करता केवळ माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर अनेक मिसळ प्रेमी या मिसळशी जोडले गेले.
कमालीची स्वछता आणि गुणवत्ता
कमालीची स्वछता आणि गुणवत्ता असा नावलौकिक असलेल्या या मिसळ हाऊस चा दिनक्रम सुरू होतो तो पहाटे ३ वाजता. आवटी स्वत: मिसळी साठी लागणाऱ्या ओल्या मसाल्याची फोडणी करतात.
मिसळीसाठी लागणारे गोडे मसाले त्यांच्या पत्नी घरी तयार करतात. गेल्या पाच वर्षांत मिसळ उरली असं कधीच झालं नाही. मिसळवर उपवास सोडणारे अनेक जण इथं पाहायला मिळतील.
गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे
इतकचं नाही तर गर्भवती महिलांना ही काटाकिरर मिसळीचे डोहाळे लागतात. आणि हे डोहाळे पूर्ण करण्यासाठी अगदी नवव्या महिन्यात ही महिला आपल्या पतीसोबत येतात. काटाकिरर ची वाढती मागणी लक्षात घेऊन आवटी यांनी जयसिंगपूरला शाखा सुरू केली. लवकरच अन्य ठीकाणीही शाखा सूरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
(स्वप्नाली अभंग ) कोणतंही शुभ कार्य ठरलं, अपेक्षित, अनपेक्षित लाभ झाला, तर आनंद पेढे वाटून साजरा केला जातो. प्रसादात तर पेढ्यांना मानाचं स्थान असतं. तसा हा पेढ्यांचा ‘गोड योग’ प्रत्येकाला आयुष्यात अपेक्षित असतो.
मात्र हा दुग्धशर्करा योग साजरा करण्यासाठी पेढाही तसाच हवा, चविष्ट नाही तर चांगल्या गोड क्षणाचीही चव जाते. प्रवासाला किंवा गावाला गेला होता, तर काय आणलं?, असंही विचारलं जातं. तेव्हा चांगले पेढे घेऊन जाणे कधीही चांगलं.
पुणे जिल्ह्यातील ओतूरचा प्रसिद्ध पेढा ओतूर पुणे जिह्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलं आहे . मूबंई-अहमदनगर महामार्गावरचं हे गाव तसं फक्त तसं पेढ्यांसाठीचं प्रसिद्ध नाही. तर ते अनेक कारणांसाठी प्रसिध्द आहे. त्यातलं एक गोड कारण फकिर भाईंचे पेढे. रूढ अर्थाने या पेढ्यांचे नामकरण फिकारयाचा पेढा असं झालं आहे.
ओतूर एस.टी स्टॅन्ड लगतच फकीरभाईंचे पेढ्याचं दुकान आहे. या पेढ्यांचा व्यवसाय अगदी मर्यादित असला, तरी या पेढ्यांची ख्याती मुंबंई, पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात पसरली आहे. अस्सल खवा, साखर, वेलची इतकं साधं कॉबिनेशन असलेले पेढे हे स्थानिकांच्या पसंतीला उतरले आहेत.
फकीरभाईंचा एक पेढा हा 40 ग्रँमचा आहे. पेढ्याची गोडी तशी मध्यम आहे. पेढ्याला हलकासा वेलचीचा स्वाद आहे. हीच या पेढ्याची खासियत आहे. हा पेढा डायबेटिस पेशंट ही खाऊ शकतात. (आपल्या प्रकृतीप्रमाणे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
फकीरभाईंच्या पेढ्यांची 45 वर्षांची परंपरा
फकीरभाई पापाभाई तांबोळी मागील ४५ वर्षापासून या पेढ्यांची टेस्ट टिकवून आहेत. फकीरभाई रोज सुमारे सव्वाशे लीटर ताजं म्हशीचं दूध आटवतात, हा खवा आणि त्यापासून पेढे हा च्यांचा नित्याचा दिनक्रम ठरलेला.
हा खवा चांगला भाजून घेतला जातो, त्यानंतर साखरेच्या पाकात मिश्रण बनवलं जातं. तासभर हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवल्यानंतर त्याचं मिश्रण बनवलं जातं. फकीरभाई सुरूवातीला फेरीवाल्यासारखे पेढे विकायचे, आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे.
ओतूर गावच्या आठवडी बाजारात तसेच श्रावण महिन्यातील ओतूरच्या जत्रेत, सुट्ट्यांच्या काळात या पेढ्याला अधिक मागणी असते. शहराकडे गावाकडून काय आणलं असं विचारणाऱ्या मित्र-आप्तेष्टांसाठी गावकरी, पाहुणे मंडळी चार-चार किलो पेढे पुण्या-मुंबईला नेतात.
फकीरभाईंच्या पेढ्यांचा खप
फकीरभाईंच्या पेढ्यांचा दरदिवशी 30 ते 40 किलोचा खप होता. व्यवसाय वाढीसाठी फकीरभाईंना मोठ्या शहरांमधून ऑफर येतात, पण गुणवत्ता टिकवण्यासाठी फकीरभाई नकार देतात आणि आपल्या या छोट्याशा ‘गोड’ जगात समाधान मानतात.
फकीरभाईंच्या 1 किलो पेढ्यांची किंमत आहे 240 रूपये (2013 या वर्षातील भाव)
फकीरभाईंचा एक पेढा 40 ग्रँमचा असतो, तुम्हाला 20 ग्रँमचा पेढा हवा असेल तर तो ऑर्डर करून मिळू शकतो. गरीब शेतकरी घरी आठवडी बाजारातून घरी परतत असतांना दोन-दोन पेढे नेतात, चाळीस ग्रॅमचा हा पेढा 10 रूपयांना मिळतो.
पुणे हे खवय्याचं शहर म्हणून ओळखलं जातं हे तर निर्विवाद सत्य आहे. पण त्यातही पूणेरी मिसळ आणि खवय्ये याचं अतूट नातं आहे. या पुणेरी मिसळीचा ऎक वेगळाच चाहता वर्ग आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मिसळी मिळतात पण टिळक रस्त्यावरच्या रामनाथ मिसळीची बात काही औरच.
पन्नास वर्षांची परंपरा
पुण्यातली ही सर्वात जुनी आणि प्रसिध्द मिसळ. जवळपास ५० वर्षांचा इतिहास असलेलं हे दुकान होतं रामनाथ कुमंठेकरांचं पण ४० वर्षां पुर्वी ते विकत घेतलं शांतीलाल खन्ना यांनी. शांतीलाल खन्ना यांनी रामनाथ या नावाबरोबरच मिसळीची गुणवत्ता आणि चव या दोन्ही गोष्टी कायम टिकवून ठेवल्या.
रामनाथ मिसळीची वैशिष्ट्य म्हणजे झणझणीतपणा. तिखटासाठी प्रसिध्द असलेल्या या मिसळीने केवळ पुण्यातल्याच नव्हे तर दिल्ली, मुबंई, केरळ आणि त्याचबरोबर परदेशातल्या खवय्यांनाही आकर्षित केलं आहे.
खवय्यांची गर्दी
तळलेले कांदा पोहे त्यावर शेव चिवडा, वाटाण्याचा रस्सा आणि त्यावर कांदा, लिंबू, काय सुटलं ना तोंडाला पाणी? इथं पण ही मिसळ नुसतं तोंडालाच नाही तर नाका डोळ्यांना ही पाणी आणते तेव्हा जरा जपून. रस्सा वाटीत येतो. कमी तिखट, मिडीयम आणि तर्रीबाज तिखट असे तीन रस्सयाचे प्रकार तुम्ही आवडी नुसार निवडू शकता. तर अशी ही मिसळ चापण्यासाठी खवय्यांची रांग लागणं नवीन नाही.
सेलिब्रिटीजची मांदियाळी
केवळ रामनाथची मिसळ खाण्यासाठी मुद्दाम पुण्यात येणारे अनेक जण आहेत. काहीजण इथली मिसळ पार्सल करून परदेशात ही नेतात. अनेक कलाकार मंडळी ही मिसळीची फॅन आहेत. दादा कोंडके, निळू फुले ते अजय-अतुल पर्यंत अनेक कलाकारांनी या मिसळीचा आस्वाद घेतला आहे. फक्त ३०० स्कवेअर फूटांच्या जागेत असणारं या दुकानातल्या पदार्थांची किर्ती मात्र अफाट आहे.
या वास्तूत जादू
या वास्तूत जादू आहे, त्यामूळे इथला पदार्थ हमखास चांगला होतोच असं रामनाथ मिसळचे रणजित खन्ना म्हणतात. विषेश म्हणजे इथं ४० वर्षां पुर्वीचे आचारी अजून टिकून आहेत. परंतू या मिसळी साठी रांगा लावणारे खवय्ये हेच या मिसळीचे खरे चाहते आहेत.
हे खवय्ये नुसती मिसळ खात नाही, तर तर त्याबरोबर रस्सा ही पितात. मिसळी बरोबरच जर गोल भजी आणि बटाटे वडा याचां उल्लेख केला नाही तर या दोन्ही पदर्थांवर तो अन्याय ठरेल.
गरम गरम टपोरे गॊला भजी आणि मोठ्या आकाराचा बटाटे वडा यांचा तर मोह आवरणं अशक्य. बटाटा वड्यायाच्या आतली भाजी तर अगदीच वेगळी बच्चे कंपनीला हमखास पंसत पडणारी. जर कधी रामनाथ च्या बाहेर रांग लावण्याचा योग आला तर इथली मेन्यू पाटी नक्की तुमचं मनोरंजन करेल.
पाककला निपुण गृहिणीही जेव्हा आपल्या हाताच्या चवीला कंटाळतात, तेव्हा सहकूटंब रामनाथकडे वळतात ’ हे पाटीवरचे मजेशीर वाक्यं तसेच अफालातून मेन्यू खाण्यात रंगत आणतात.
मेन्य़ू
सुपर, हूप्पर बटाटॆ वडा
तबकडी बजी (बटाटा भजी)
खेकडा भजी ( कांदा भजी)
हमदर्द दहिवडा
जवा मर्द कोल्हापुरी मिसळ
मिसळची ऎका प्लेट चा दर आहे ४० रुपये (2013)
गोल भजी २० रुपये प्लेट तर एका बटाटे वड्याची किंमत आहे १० रुपये.